
सुनील कुहीकर…
लिहून घ्या! नोट करून घ्या! विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय गांधींचाच असणार आहे. हो! असणार कसा नाही? तयारी बघितली, कशी जोरात चालली आहे त्यांची. लढाई लढायची तर ती जिंकण्यासाठीच, अशा बाण्यानं त्यांचा वारू कसा उधाणलाय! निवडणूक कशी लढायची असते, हे मैदानातील इतर उमेदवारांना ‘दाखवून’ देत पहिल्या दिवसापासूनच त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दिमतीला दस्तूरखुद्द एका राजकीय पक्षाचे पाठबळ असल्यावर त्यांच्यावर होणाऱ्या खऱ्या आरोपांनाही भीक कोण घालतो? कधीकाळी गांधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध डायरेक्ट बोलायचेत म्हणे! भाजपा विरुद्धही आगपाखड करायचे ते. पण आता खुद्द ‘साहेबांचा’ आशीर्वाद लाभल्यावर तो जुना इतिहास आपसुकच विस्मरणात गेलाय् अनेकांच्या. सत्तेपुढे न चालणाऱ्या शहाणपणानं त्या इतिहासावरची जळमटं आणखीच गडद झाली आहेत.
तर सांगायचा मुद्दा असा की, विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी अतिशय ताकदीनं उतरले आहेत. राजकारण काय, सांस्कृतिक क्षेत्र काय सर्वदूर बोलबाला असलेल्या एका कर्तुत्ववान माणसावर, केवळ तो साहित्यिक नसल्याचा आरोप तसा अन्याय करणाराच म्हणावा लागेल. काय फरक पडतो गांधी साहित्यिक नसल्यानं? चार-दोन पुस्तक नावावर असणं ही काय ओळख झाली एखाद्या साहित्यिकाची?
पद, पैसा, एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ मिळवण्याची ताकद, घरोघरी जाऊन त्यांच्यासाठी मतपत्रिका मुकाट्यानं ‘गोळा’ करून आणणारी माणसं… याची तुलना कुठल्या ‘साहित्या’शी होऊ शकणार आहे?
अर्थात, साहित्य संघाच्या वास्तूला अशा राजकारणाची सवय आहे. आजवर म्हैसाळकर याच पद्धतीने सारं काही ‘मॅनेज’ करायचे म्हणे! घरोघरी मतपत्रिका पाठवायच्या किंवा पाठवल्याचे सांगून आपल्याच ताब्यात घ्यायच्या आणि मग आपल्या मर्जीतील माणसांच्या नावापुढे टिकमार्क करून निवडणुका ‘जिंकायच्या’ … ही विदर्भ साहित्य संघाची ‘परंपरा’ कायम राखण्याचा आटोकाट प्रयत्न यंदाही काही लोक करत आहेत म्हणे! त्यात गांधींचे नाव आघाडीवर असणे क्रमप्राप्तच नाही का? पण लोक ना फारच जळकुकडे असतात! आता घेतल्या असतील एखाद्या उमेदवाराने मतपत्रिका लोकांकडून, हिरावला असेल मतदारांचा मतदानाचा अधिकार, मॅनेज केलेल्या पोस्टमनने कुणाच्यातरी नावाच्या पत्रिका दिल्या असतील अन्य कुणाच्यातरी हाती, निर्वाचन अधिकाऱ्यांनी एखाद्या मतदाराच्या नावे एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला उदार मनाने करू दिले असेल मतदान, तर हा काय गुन्हा झाला का त्यांचा? एवढ्यानं काय आकाश कोसळणार आहे? आजवर शेवाळकर, द्वादशीवार, म्हैसाळकर नाही का याच पद्धतीने निवडून आलेत? विद्यमान अध्यक्ष तर निवडून देखील आलेले नाहीत. म्हैसाळकरांनी, संस्थेच्या संविधानातील तरतुदी पायदळी तुडवून त्यांचा ‘राज्याभिषेक’ घडवून आणला होता म्हणे! आता गांधीही याच पद्धतीचा अवलंब करत असतील, निवडणूक जिंकून विजय संपादन करण्याचा मानस व्यक्त करत असतील, त्या दृष्टीने कार्यप्रवण होत असतील, तर इतरांच्या पोटात का दुखावे बरे!
साहित्य संघाच्या कार्यालयात एखादं पत्र धाडताना, विदर्भ साहित्य संघ, c/o निलावार साडी सेंटर, असा पत्ता लिहावा लागतो, ही साहित्य संघाची आजवरच्या कर्तुत्ववान नेतृत्वाने निर्माण केलेली ओळख आहे. ती मोडीत काढून साहित्य संघाला नवी, गगनचुंबी, देखणी अशी इमारत बहाल करण्याचा निर्धार मनात घेऊन कुणी मैदानात उतरले असेल, तर त्याचे कौतुक नको व्हायला? पण काही माणसं असतातच नतद्रष्ट! या लोकांना विकास नको म्हणजे नकोच असतो! या संस्थेची सध्याची इमारत, तिथल्या सभागृहाच्या मंचावर पडलेले खड्डे, कार्यक्रमच होत नसल्याने बहुतांश झाकून ठेवलेल्या खुर्च्या, बिल्डरला इतक्या वर्षात प्लास्टरिंगही करावेसे वाटू नये, अशी या इमारतीची एखादी बाजू…. ही काय अवस्था झाली? इतक्या वर्षात आपण ही इमारत कागदावरील करारानुसार पूर्ण करू शकलो नाही, याचे शल्य संबंधित बिल्डरला असावे बहुधा. ते शल्य कुठेतरी व्यक्त झाले आणि मग विकासाच्या कल्पनेची चक्र नको तितक्या वेगानं फिरू लागली. ‘साहेबां’ना ही गोष्ट पटवून देण्यात आली. त्यांना ती पटली. त्यांनी लागलीच गांधींना गळ घातली की, आता तुम्ही सूत्रं हाती घ्या आणि करा एकदाचा या संस्थेचा उद्धार! खरंतर गांधी रिटायरमेंटच्या स्टेजला आलेले. हाती असलेला सध्याच्या कारभाराचा भार कुणाच्यातरी खांद्यावर टाकून आपण मोकळं व्हावं असा विचार अलीकडे त्यांच्या मनात अनेकदा यायचा. पण शहरातील मोक्याच्या जागेवर कार्यालय असलेल्या साहित्य संघाबाबतची ही ‘ऑफर’ ऐकली आणि त्यांच्यातील साहित्यिकाचा बाज अचानक जागृत झाला. खुद्द ‘साहेबां’नी एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवणं, हे जणू नियतीचेच आगळे वेगळे संकेत असल्याचा बोध त्यांना स्वस्थ बसू देईना! शेवटी हो, नाही करता करता त्यांनी निवडणूक लढण्यास होकार दिलाच! त्यांचा होकार येण्याचाच अवकाश की, भविष्यातील उद्धाराच्या कल्पनेनंच साहित्य संघाची भग्नावस्थेतील विद्यमान इमारत अक्षरशः शहारली. पदावर गांधी विराजमान होणार म्हणजे आता आपला उद्धार नक्की होणार अशा विचारानंच इमारतीच्या बोलक्या वेदना आनंदतरंगांनी व्यापल्या! इकडे निवडणुकीचे पडघम वाजू लागले. या इमारतीचे आणि एकूणच साहित्य संघाचे भविष्यातील उद्धारकर्ते केवळ आणि केवळ गांधीच होऊ शकतात याची खात्री पटलेले अनेक लोक ‘कामाला’ लागलेत. या ‘कामात’ विविध क्लृप्त्यांचा समावेश होता. पण, काही नतद्रष्ट लोकांना त्यात मतांची चोरी दिसली, काहींनी उगाच पोलीस तक्रारी नोंदवत कांगावा केला, काहींनी निवडणूक अधिकाऱ्यांवर लांछन लावले, काहींनी गांधींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली…. अरे कुठे फेडाल ही पापं? त्यांचे कार्यकर्ते करत असलेले मतपत्रिकांचे संकलन म्हणजे एका अर्थाने ‘साहित्य’सेवाच आहे, हे कळत कसे नाही यांना? त्या मतपत्रिकांवर त्रयस्थांकडून होत असलेले एकगठ्ठा मतदान, हे प्रत्यक्ष मतदारांच्या मताधिकाराचे हनन नसून, भारतीय लोकशाहीच्या भविष्यकालीन व्यवस्थेचे ते विद्यमान काळातील प्रात्यक्षिक आहे, हे समजण्याची कुवत नसलेली, मर्यादित बौद्धिक क्षमतेची माणसंच अशा ‘महान’ कार्यावर आक्षेप घेऊ जाणोत. खरंतर, गांधीच कशाला, थोड्याफार फरकाने जवळपास सर्वच उमेदवारांनी हा प्रकार यापूर्वी आणि आताही केला आहे. आजवरच्या इतिहासात या प्रकाराविरुद्ध कधीही चकार शब्द न काढणाऱ्यांना आता तो काढण्याचा अधिकार काय उरतो, असा सवालही काही बापुडे विचारताहेत. खर आहे! काही काळ निवडणुकीच्या राग रंगात रंगून, नंतर त्या इमारतीकडे ढुंकूनही न पाहणाऱ्यांना इथल्या राजकारणाबद्दल बोलण्याचा अधिकार तरी काय उरतो सांगा?
तसेही, या देशात सामान्य माणसाचे अधिकार मान्य आहेत कुणाला? लोकशाही व्यवस्थेने बहाल केलेल्या एका मताची किंमत त्याला स्वतःलाच कळत नाही. कधी पैशानं, कधी दारूच्या एका बाटलीसाठी तो आपल्या मताचा सौदा करतो. तर इथे अनेकांनी आपल्या मतपत्रिका, काहींनी तर कोऱ्या मतपत्रिका कोणाच्यातरी हातात सोपवून स्वतःच्या मताधिकाराचा खून केलाय्. असले मतदार ज्या देशात सहज ‘उपलब्ध’ आहेत, त्या देशात साहित्य संघासारखी एखादी छोटीशी संस्था ‘ताब्यात’ घेणं, कितीसं कठीण असणार आहे? त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांबाबत अजिबात चिंता नको. कारण, गांधींनी इतकी सारी जय्यत तयारी केल्यावर, निवडणुकीचा निकाल इतरांच्या बाजूने लागेलच कसा? तर, सांगायचा मुद्दा असा की, कोणी काही म्हणा! कितीही आरोप करा. यंदाच्या निवडणुकीत निवडून येणार तर ‘गांधी’च! त्यांच्यासारखी ‘साहित्य’सेवा ज्यांना जमली नाही, ज्यांना एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ मिळवता आले नाही, ज्यांना साधे पोस्टमन मॅनेज करता आले नाहीत, ज्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्रयस्थाच्या मतपत्रिकेवर मतदान करता आले नाही, त्यांना विजयाचा जल्लोष साजरा करण्याचा ‘नैतिक’ अधिकारच काय उरतो? मुळात, त्यांनी निवडणूक लढण्याच्या भानगडीत पडायचेच कशाला म्हणतो मी!
अशा तमाम ‘सज्जनांनी’ बसावे टाळ, मृदंग वाजवून भजन करत….विजयाची पताका फडकावतील ते गांधीच!















