“हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या..”.. भुजबळांचा कुणाला इशारा?

0

(Nashik)नाशिक– राज्य सरकारने झुंडशाहीपुढे नमते घेऊन लाखो लोकांना ओबीसी आरक्षणात मागच्या दाराने प्रवेश दिल्याचा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीच केलाय. भुजबळ म्हणाले, पुन्हा त्यांचे सगेसोयऱ्यांचे सुरु झाले आहे. त्यामुळे आम्हाला आमदार, खासदार, प्रशासन आणि न्यायालयाकडे दाद मागावी लागणार आहे. लोकशाहीने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याचा आम्ही वापर करणार आहोत, असेही भुजबळ म्हणाले. या निमित्ताने भुजबळ यांनी सरकारवरच निशाणा साधला आहे.

मराठा समाजाबद्दल माहिती असलेले जे अभ्यासक आहेत, ते मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी करीत आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले, सध्या झुंडशाहीपुढे नमते घेऊन निर्णय घेतले जात आहेत. आमच्या आरक्षणाला धक्का लागला जावू नये. ते एका जातीसाठी लढत आहेत, मी मात्र ३७४ जातींसाठी लढत आहे. हिंमत असेल त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावे, असेही ते म्हणाले.

महायुतीत जुंपणार?

दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्येच जुंपणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी निशाणा साधला आहे. (Chhagan Bhujbal) छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तर आरक्षणावर राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री भुजबळांना लगावला आहे.