
(New Dellhi)नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मोबाइल फोन्सच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात (Import Duty) सरकारने कपात केली आहे. त्याचा परिणाम मोबाईल फोन आणखी स्वस्त होण्यात होणार आहे. केंद्र सरकारनं या संदर्भात एक अधिसूचना काढली असून स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळं मोबाइल फोनचे उत्पादन स्वस्त होईल आणि फोनच्या किमती कमी होतील.
विश्वसनीय सूत्रानुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी रात्री अधिसूचना काढून निर्णय जाहीर केलाय. आयात शुल्कात कपात करण्यात आलेल्या मोबाईलच्या सुट्या भागांचा तपशीलही त्यात देण्यात आलाय. बॅटरी कव्हर, मुख्य कॅमेरा लेन्स, बॅक कव्हर्स, प्लास्टिक आणि धातूच्या वस्तू, जीएसएम अँटेना आणि इतर अनेक भागांवरील आयात शुल्क कमी होणार आहे. या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे. मोबाइलच्या आणखी काही पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करून १० टक्क्यांवर आणले गेले आहे. यात कंडक्टिव्ह कापड, एलसीडी कंडक्टिव्ह फोम, एलसीडी फोम, बीटी फोम, बॅटरी हीट प्रोटेक्शन कव्हर, स्टिकर बॅटरी स्लॉट, मेन लेन्स प्रोटेक्टिव्ह फिल्म, एलसीडी एफपीसी, फिल्म फ्रंट फ्लॅश आणि साइड आदी सुट्या भागांचा समावेश आहे. या निर्णयामुळे मोबाईल फोनच्या निर्मितीला आणखी चालना मिळणार आहे.