
बोर्डाच्या परीक्षांवरील बहिष्काराला संघटनाचे वाढते समर्थन
(Nagpur)नागपूर, 30 जानेवारी
पुढच्या काही दिवसात बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य घेण्यास नकार देत हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा रिक्त जागा असून 2012 पासून भरती प्रक्रिया झाली नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने अनेक शाळा डबघाईस येऊन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. करीता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने यावर्षीच्या शालांत परीक्षेवर बहिष्कार घालण्याचे व शाळांच्या, महाविद्यालयांच्या इमारती व कर्मचारी परीक्षांसाठी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने अजुनही या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कोणतीही हालचाल केलेली नाही.
त्यामुळे बहिष्कार आंदोलन तीव्र करण्याचा महामंडळाने निर्णय घेतला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्राचार्य फोरम, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.