
विभागीय कार्यालयासमोर एसटी कर्मचारी एकवटले
(Yavatmal)यवतमाळ – एसटी कामगार संघटनेने आपल्या आर्थिक मागण्या शासन व प्रशासनाने सोडवाव्यात या मागणीसाठी यवतमाळच्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एसटी कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोग, अरिअर्स, वेतनात तफावत अशाप्रकारच्या आर्थिक व प्रशासकीय मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. आझाद मैदानात कर्मचार्यांनी उपोषण केले. त्यावेळी संघटनेसोबत बैठक घेवून मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर काहीही झाले नाही. परिणामी एसटी कर्मचार्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सदाशिव सिवनकर, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना दिला आहे.
(Buldhana)बुलढाणा – सातवा वेतन आयोग लागू करा, 2016 पासूनचा थकीत महागाई भत्ता व घर भाडे देण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये वेतन वाढ देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा विभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या राज्यभर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण व आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने तात्काळ मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी राजेंद्र पवार, विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना यांनी केली.