अदानींवरील हिंडेनबर्गच्या गंभीर अहवालाची चौकशी करा, काँग्रेसची मागणी

0

नवी दिल्ली – अदानी समूहाने शेअर्सची हेराफेरी केल्याचा दावा अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या अहवालात करण्यात आला असून अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली. (Congress Demands Inquiry on Adani-Hindenburg issue) या आरोपांची रिझर्व्ह बँक आणि सेबीमार्फत चौकशी आवश्यक असल्याचे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहाच्या शेअर्सच्या मूल्यांकनापासून कार्पोरेट गव्हर्नन्सपर्यंतचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अदानी समूहाने अहवालातील आरोपांचा इन्कार केला असून न्यायालयात खटला दाखल करण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे हिंडेनबर्ग संस्था आपल्या अहवालावर ठाम आहे. या आरोप प्रत्यारोपानंतर अदानी समूहाचे शेअर सलग दोन दिवस घसरणीवर होते.

काय आहेत आरोप? हिंडंनबर्ग रिसर्चच्या ३२ हजार शब्दांच्या अहवालात अदानी समूहावर मोठे आरोप करण्यात आले आहेत. अदानी समूहाने शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉड केला असून ‘कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी फसवणूक’ असल्याचा दावाही हिंडेनबर्गने केला आहे. अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळले असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
परिणाम काय?
दरम्यान, अदानी समूहावरील या आरोपांनंतर अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये १७.३८ टक्क्यांपेक्षाही जास्त घट झाली आहे. एका दिवसात सुमारे १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असून गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९८.५ अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. अब्जाधीशांच्या यादीत ते चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर त्यांची संपत्ती १०० अब्ज डॉलरच्या खाली आली आहे. मागच्या दोन दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण भागभांडवल सुमारे ४ लाख कोटी रुपयांनी घटल्याचे सूत्रांनी सांगितले.

एलआयसीला फटका
अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे एलआयसीचे 18 हजार कोटींहून अधिक रुपये बुडाले असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी अदानी समूहातील एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य 81 हजार कोटींच्या जवळपास होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा