महाराष्ट्र-कर्नाटक वादात जयंत पाटलांनी एलन मस्क यांनाही ओढले!

0

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra Karnataka border dispute ) प्रश्नावरून राजकीय तणातणी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या एका ट्विटची मोठी चर्चा सुरु आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरचे मालक एलन मस्क यांनाही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात ओढले आहे. आठवडाभरापूर्वी दोन राज्यात तणाव निर्माण करणारे ट्विट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांनी केले नव्हते, असा दावा बोम्मई यांच्यासह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही केला होता. आता त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केले आहे? याचा निकाल तुम्ही पायउतार होण्यापूर्वी द्यावा, अशी विनंती केली आहे. अलिकडेच मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल विचारून त्यावर पोल घेतले आहे. मात्र, जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात ओढले.
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये एलन मस्क यांना उद्देशून नमूद केले की, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलन मस्क, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?” विशेष म्हणजे आपण ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावे का? यावर एलन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा