नागपूर : शिवसेनेवर ताबा कुणाचा, याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही राज्यातील सत्तासंघर्षावरील दावे व प्रतिदाव्यांची सुनावणी सुरु आहे. ठाकरे व शिंदे गटात शिवसेनेवरून सुरु असलेला वाद नागपुरात आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही पोहोचला आहे. विधान भवन परिसरातील शिवसेनेचे कार्यालय नेमके कोणत्या (Winter Assembly Session Nagpur) गटाला मिळणार, असा प्रश्न अधिवेशनापूर्वी विचारला जात होता. आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने या कार्यालयावर ताबा (Shiv Sena Legislative Party Office) मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दुसरीकडे कार्यालय देण्यात आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विधान भवन परिसरातील शिवसेना कार्यालयात आपले बस्तान बसवले होते. त्या कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि आदित्य ठाकरे या तिघांचे फोटोही लावले होते. ठाकरे गटाच्या लोकांनी काही दिवस ते कार्यालय चालविले देखील होते. मात्र, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी नागपुरात आल्यावर त्यांना याबाबत विचारले गेले. सोमवारी सकाळी त्या कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे फलक लागले. कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटविण्यात आले असून तेथे शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाच्या प्रतोदांची पाटीही तेथे लागली आहे. ठाकरे गटाला समाजवादी पार्टी, शेकाप सारख्या छोट्या पक्षांच्या कार्यालयांच्या रांगेत कार्यालय देण्यात आले. ठाकरे गटाचे हे कार्यालय विधानभवन इमारत परिसराच्या अगदी शेवटच्या भागाला एक्झीट गेटजवळ आहे.