हिवाळी अधिवेशनाची थंड सुरुवात

0

कर्नाटकची दडपशाही, महापुरुषांबाबतची वक्तव्यं, धानाला बोनस असे मुद्दे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात एखाद्या गाजत असलेल्या व सरकारला अडचणीत आणणाऱ्या विषयाने होत असते. पहिल्याच दिवशी विरोधक कमालीचे आक्रमक होऊन सभागृृहांचे कामकाज दणाणून सोडतात. मात्र, सोमवारी सुरु झालेल्या अधिवेशनाची सुरुवात काहीशी थंड म्हणावी अशीच झाली. अधिवेशनाची सुरुवात म्हणून विरोधकांनी कर्नाटक सरकारची कथित दडपशाही, भाजप नेत्यांची महापुरुषांच्या संदर्भातील वक्तव्ये, विदर्भातील धान उत्पादन शेतकऱ्यांना बोनस असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांना डिवचण्यासाठी विरोधकांनी ‘५० खोके एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा आणि वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला सत्ताधाऱ्यांनी दाद दिली नाही. विरोधकांच्या वतीने अजित पवार यांनी कर्नाटक सरकारच्या कथित दडपशाहीचा मुद्दा सभागृहात व सभागृहाबाहेर उपस्थित करीत भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत केंद्राने या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप केला ही मोठी बाब असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने प्रसार माध्यमांपुढेही भूमिका मांडली असून त्याचे तुम्ही स्वागत केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


गडचिरोलीतील सुरजागड प्रकल्पाचा मुद्दाही विधानसभेत वेगळ्या पद्धतीने उपस्थित झाला. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना धमक्या येत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सरकारची भूमिका मांडत आत्राम यांना संरक्षण देणार असल्याची ग्वाही दिली. त्याचवेळी नक्षलवाद्यांना घाबरून औद्योगिक विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकार मधील मंत्र्यांना धारेवर धरले. काही मंत्री अधिवेशनात शर्टाच्या खिशाला पक्षाचे चिन्ह असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्याची दखल घेत पवार यांनी मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नये, नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल असा इशारा यावेळी बोलताना दिला.


दरम्यान, आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह विधानभवनात दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नाशिक येथील आमदार सरोज अहिरे या चर्चेचा विषय ठरल्या. विधान भवनाच्या बाहेर प्रसार माध्यमांनी त्यांच्यापुढे गराडा घातला होता. विधान भवनात स्वतः मुख्यमंत्र्यांनी आमदार अहीरे यांची दखल घेऊन त्यांची भेट घेतली व बाळाची विचारपूस केली. बाळाचे नाव प्रशंसक असे ठेवण्यात असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी त्यांचे पती, सासुबाई देखील उपस्थित होत्या. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या अधिवेशनात येणार असल्याची माहिती असून ते महाविकास आघाडीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने तरी अधिवेशन तापणार की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.