‘जिओ फायनान्शियल’ बनली २० अब्ज डॉलरची कंपनी

0

(Mumbai)मुंबई : (Businessman Mukesh Ambani)उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून वित्तीय सेवा क्षेत्रातील (Reliance Strategic Investments Limited)‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ ही कंपनी वेगळी करण्यात आली असून तिचे नाव आता (JIO FINANCIAL SERVICES LIMITED) ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ असे बदलण्यात आले आहे. या कंपनीचे शेअर्स भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्यात येणार असून कंपनीचे मूल्य अंदाजे २० अब्ज डॉलर असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही कंपनी मूल्यांकनानुसार आघाडीच्या ४० भारतीय कंपन्यांपैकी एक असेल, असे मानले जात आहे. दरम्यान, या मूल्यांकनामुळे कंपनी अदानी, कोल इंडिया आणि इंडियन ऑईलच्याही पुढे गेल्याचे मानले जात आहे.

शेअर बाजाराने या नव्या कंपनीच्या शेअरची प्रत्येकी किंमत २६१.८५ रुपये निश्चित केली. तर विशेष सत्राच्या शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची प्रति शेअर किंमत २,५८० इतकी निर्धारित झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज ही दोन्ही बाजारात प्रमुख निर्देशांकातील एक वजनदार घटक आहे. गुरुवारी अंमलात आलेल्या विलगीकरणामुळे निर्देशांकाच्या रचनेत आणि कामकाजात कोणताही व्यत्यय येणार नाही, यासाठी ‘आरएसआयएल’ला निफ्टी निर्देशांकातील ५१ वा समभाग म्हणून सूचिबद्ध केले जाणार आहे. विलग झालेल्या कंपनीचे शेअर्स हे एकास एक प्रमाणात रिलायन्सच्या भागधारकांना मिळणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांकडे २० जुलैला रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग असतील, अशा गुंतवणूकदारांना नव्याने स्थापित ‘आरएसआयएल’चे शेअर्स मिळतील. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे दहा समभाग असल्यास नवीन कंपनीचेदेखील दहा समभाग प्राप्त होतील. सर्वप्रथम पात्र भागधारकांना शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर शेअर्सच्या सूचिबद्धतेची तारीख जाहीर केली जाणार आहे. तोवर गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नसल्याची माहिती देण्यात आली.