अमरावती: अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात एनआयए ने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात नेमक्या कोणत्या कारणापायी कोल्हे यांची हत्या करण्यात आली, ते कारणही एनआयए ने स्पष्ट केले (NIA File Charge Sheet Umesh Kolhe Murder Case) आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबद्धल केलेल्या वादग्रस्त व्यवव्याच्या समर्थनात कोल्हे यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टच्या विरोधात त्यांची हत्या करण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण ११ आरोपींचा समावेश असून त्यात प्रामुख्याने मुदस्सीर अहमद, शाहरुख खान, अब्दुल तौफीक शेख, मोहम्मद शोएब, अतिब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाझ, मुशफिक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहमद या आरोपींच समावेश आहे. हे सर्वच आरोपी अमरावतीचे रहिवासी आहेत, असे सांगण्यात आले.
21 जून 2022 रोजी अमरावतीच्या घंटाघर परिसरात आरोपींनी दहशत पसरवण्याच्या हेतूने उमेश कोल्हे याची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला अमरावती पोलिसांनी या घटनेचा तपास केला.
त्यानंतर तपास एनआयए ला सोपविण्यात आला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने भारतीय दंड संहितेच्या कलम 120, 302, 153-अ सहित इतर कलमांनुसार 2 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याचा मनात राग धरूनच कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी हल्ला करण्यासाठी दहशतवादी टोळी तयार करून गुन्हेगारी कट रचला होता, असे एनआयए ने म्हटले आहे. या प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग पोलिसांना झाला आहे.