मुंबई :राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली कथित वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद तसेच राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत आयोजित मोर्चास सुरुवात झाली (MVA Mumbai Morcha) असून भायखळा येथून सुरु झालेला हा मोर्चा टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत प्रवास करणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शेवटच्या क्षणी हजर होणार आहेत. तर मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर मोठे नेते सहभागी झाले आहे. मोर्चात सहभागी बड्या नेत्यांसाठी सर्व सोयींनी सुसज्जित व्हॅनिटी व्हॅन तैनात ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळविण्यात आली आहे. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाती नेत्यांची कथित वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्रातील उद्योगांची कथित पळवापळवी असे अनेक विषय घेऊन महाविकास आघाडीने हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रपेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दुपारी या मोर्चात शरद पवार हे संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकर्ते हातात फलक व झेंडे घेऊन सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह आमदार आणि खासदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येत मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
भाजपचे माफी मांगो आंदोलन
एकीकडे मविआचा महामोर्चा सुरु असताना तर दुसरीकडे भाजपने माफी मागो आंदोलन सुरू केले आहे. अमोल मिटकरी, सुषमा अंधारे या नेत्यांनी त्यांच्या वादग्रस्त व अवमानजनक वक्तव्यांवर माफी मागितली पाहिजे, यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले.