नाशिक : राजकीय युतीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडीशी चर्चा सुरु आहे. मात्र, अद्यापही युतीचा अंतिम निर्णय झालेला नसलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाव्य युतीवर भाष्य केले आहे. (Prakash Ambedkar on Alliance with Thackeray) शिवशक्ती- भीमशक्ती युतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध कायम असल्याचे दिसत असून आता उद्धव ठाकरे यांनीच निर्णय घ्यायचा असल्याची प्रतिक्रिया आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. याच महिन्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये संभाव्य युतीवर अनेक बैठका पार पडल्या आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांच्यातही स्वतंत्र बैठक झाली आहे. मात्र, युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
धम्म मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नाशिकमध्ये होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संभाव्य युतीच्या प्रश्नावर उत्तर दिले. शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचे काय झाले, असे विचारले असता आंबेडकर यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा युतीला विरोध असल्याचा संशय बोलून दाखविला. आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीशी संभाव्य युतीचा विषय निकाली काढतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यानंतर पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला की नाही, हे माहिती नाही. पण हा विषय चर्चाधीन असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे त्याचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट होते, असे आंबेडकर म्हणाले. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वंचित आघाडीला सोबत घ्यायला तयार नव्हते. त्यांची आजही तीच भूमिका असावी, असेही आंबेडकर म्हणाले. युती करायची नाही, याचा निर्णय आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही श्रीमंत मराठ्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्यांचा वंचित बहुजन आघाडीला सामाजिक विरोध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नाही तरी आम्ही भाजपसोबत जाणार नाही. कारण वंचित बहुजन आघाडी ही पहिल्यापासून मनुवादी व्यवस्थेविरोधात काम करत आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती शक्य नाही, मात्र शिवसेनबरोबर जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले.