महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात प्रवेश बंदी, कर्नाटक सरकारचा फतवा

0

बेंगळुरू: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला असताना कर्नाटक सरकारने एक फतवा काढून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्याला बेळगावात येण्यास कर्नाटक सरकारने बंदी (Karnataka Government bans entry of Maharashtra Ministers) घातली आहे. कर्नाटक सरकारच्या या फतव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे पत्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवले आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्रे पाठवले असल्याची माहिती देण्यात आली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्र पाठवले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हाला कोणताही फॅक्स मिळालेला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने कर्नाटकात कार्यक्रम असतात. त्यामुळे कर्नाटकातील लोकांनी विनंती केली की तुम्ही 6 डिसेंबरला यावे. त्यामुळे मी 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार आहे. तिथे आंबेडकरवाद्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.