उपचारासाठी आलेल्या खासदाराची हत्या

0

पोलिसांनी केली 3 बांगलादेशी मारेकऱ्यांना अटक

भारतात उपचारासाठी आलेले बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम यांची कोलकाता येथे हत्या करण्यात आली. उपचारासाठी ते 11 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले होते. भारतात बेपत्ता झालेले अवामी लीगचे खासदार अजमी अन्सार यांची कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये हत्या झाल्याचे आढळून आले. त्याचे मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. त्यांनी कट रचून खासदाराची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. खासदार अझीम कोलकाता येथून अचानक बेपत्ता झाले होते. कोलकात्याच्या राजारहाट येथील संजीव गार्डन हे त्यांचे शेवटचे लोकेशन होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, आज, बुधवारी बांगलादेशचे गृहमंत्री असदुजमान खान यांनी अझीमची हत्या झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस
प्रचारात दोन्ही पक्षांना जपून बोलण्याचे दिले निर्देश

लोकसभा निवडणुकीत जातीय आधारावर मतांचे आवाहन करणे आणि सुरक्षा दलांच्या नावाने मतदारांना भुलवणे यावर निवडणूक आयोगाने आपला आक्षेप व्यक्त केला आहे. या संदर्भात आयोगाने भाजप आणि काँग्रेसला असे करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या स्टार प्रचारकांना लष्करी आणि धार्मिक मुद्दे राजकारणात ओढू नयेत अशा सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना जात, धर्म, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर भाष्य करू नये, अशी आठवण करून दिली आहे.

अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न
वंदे मातरम् संघटना आक्रमक
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने त्याच्या अंगावर काळी शाही फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, आणि रात्री 11 नंतर पब बंद करण्याची मागणी करण्यात आली.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलीस कोठडी
पुण्यात 2 जणांना चिरडल्याचे प्रकरण
पुण्यात भरधाव वेगानं पोर्शे कार चालवून दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे सत्र न्यायालयानं विशालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी विशालला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लरला होता. त्यानं आणखी काही पुरावे लपवल्याचा संशय आहे, अन्यथा त्याला लपून बसण्याचं कोणतंही कारण नव्हतं, असा युक्तीवाद पुणे पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला.

घरगुती भांडणातून आत्महत्येचा प्रयत्न
भंडारा येथे महिलेने घेतली नदीत उडी
घरगुती वादातून एका महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली. रोशनी शत्रुघ्न मोहनकर असे या महिलेचे नाव आहे. तिला स्थानिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. लाखनी येथे राहणारे शत्रुघ्न मोहनकर व पत्नी रोशनी हे भाजीपाल्याचा व्यवसाय करीत आहेत.पती-पत्नीत झालेल्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात घराबाहेर पडून कारधा वैनगंगा नदी गाठली. तिने कारधा लहान पुलावरुन वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. मात्र नदीपात्रात मासेमारी करणाऱ्यांना महिला नदीपात्रात उडी घेतल्याचे दिसून येताच प्रवीण खंगार यांनी जीवाची पर्वा न करता वैनगंगेत उडी घेऊन महिलेला वाचविले.

एसएनडीटी विद्यापीठ प्रकल्पांतर्गत साकारतेय अद्ययावत केंद्र

दर्जेदार बांधकाम करण्याचे ना.मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे आकाराला येत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाहणी केली. या अद्ययावत केंद्राच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्याचे स्पष्ट निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले. बल्लारपूर येथील विसापूरमध्ये ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र निर्माण होत आहे. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या केंद्रामध्ये तरुणी व महिलांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्राच्या बांधकामाला सुरुवात झालेली असून यामध्ये वाचनालय, प्रेक्षागृह इमारत, शैक्षणिक इमारत आदींचा समावेश आहे.

ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू
गोंदियात पोलीस गाडी आणि माल वाहू वाहनात अपघात
गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली. एका तरुणाचा मृत्यू झाला असून मृतकामध्ये साहिल कुडमेते याचा समावेश आहे. मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत जॉब करत असून चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणि वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत. तर इतर तीन तरुण किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदू संस्कृतीचे धडे
हिंदू धर्म संस्कृती मंदिरासोबत केला सामंजस्य करार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन तसेच विस्तृत ज्ञान प्राप्त करणे शक्य होणार आहे. याबाबत हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले. भारतातील वैविध्यपूर्ण असा प्राचीन ज्ञानाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा. तत्कालीन प्रगत भारतीय ज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ याचा समावेश करण्यात आला आहे.