मुंबई (MUMBAI): अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (Maharashtra State Chemists & Druggists Association) राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर तक्रार मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून (Complaint of Corruption) केली आहे. राज्य सरकारने या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन उभे करू, असा इशारा या संघटनेने दिलाय. अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त, तणावग्रस्त असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आलेय.
पीएस, ओएसडींकडून पैशाची मागणी
असोसिएशनच्या तक्रारीनुसार, राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करण्याची कठोर कारवाई केली जात आहे. औषध विक्रेत्यांकडून मंत्र्यांचे पीएस, ओएसडी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार देखील या पत्रात करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना भेटून तक्रारी केल्यानंतर देखील भ्रष्टाचार कमी झालेला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. राज्य सरकारने ही तक्रार गांभीर्याने न घेतल्यास राज्य संघटना या विरोधात आंदोलन उभे करेल, बंदही पुकारला जाईल, असा इशारा देण्यात आलाय.
अपिलवर सुनावणी नाही
संघटनेच्या तक्रारीनुसार, औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्री महोदयांकडे अपिल करण्याची तरतुद आहे. सदर अपीलावर स्थगनादेश देणे अथवा सुनावणी लावून घेण्याचा निर्णय देणे अपेक्षित असते. अनेकवेळा शिक्षेचा संपुर्ण कार्यकाळ संपून गेला तरीही मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून अनेक वेळा निर्णय दिला जात नाही.