लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाला आमदार करण देवतळे यांच्या प्रयत्नांची जोड; १७ कोटी २५ लाखांच्या अमृत २.० योजनेतून भव्य प्रकल्पास मंजुरी

0

भद्रावती (Bhadravati)(प्रतिनिधी) – भद्रावती शहराच्या हृदयस्थानी असलेला ऐतिहासिक लेंडाळा तलाव लवकरच नव्या रूपात उजळून निघणार आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत १७ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प मंजूर झाला असून, या प्रकल्पाच्या मंजुरीमागे आमदार करण देवतळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती निर्णायक ठरली आहे.

लेंडाळा तलाव हा केवळ जलस्रोत नसून शहरवासीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग राहिला आहे. या तलावाभोवती अनेक पिढ्यांच्या आठवणी रुजल्या आहेत. मात्र गेल्या काही दशकांत दुर्लक्षित झालेल्या या तलावाच्या संवर्धनाची गरज भासू लागली होती. ही गरज ओळखून आमदार देवतळे यांनी राज्य शासन व केंद्र शासनाच्या नागरी विकास मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार केला, बैठका घेतल्या, प्रस्ताव सादर केले. त्यांनी तलावाच्या ऐतिहासिक, पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्वावर भर देत हे काम केवळ सौंदर्यीकरणापुरते मर्यादित न ठेवता एकात्मिक विकासाचे दृष्टीकोन सादर केला.

या मंजूर प्रकल्पात तलावाची सखोल स्वच्छता, गाळ काढणे, काठाच्या मजबुतीकरणासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण, फिरण्यासाठी पायवाटांची निर्मिती, दिव्यांची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्था आणि शहरवासीयांसाठी विश्रांतीचे उत्तम ठिकाण उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.