महात्मा फुले योजनेत आणखी आजारांचा समावेश होणार-आरोग्यमंत्री

0

नागपूर: गरीब वर्गासाठी वरदान ठरलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) आणखी आजार उपचारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अस्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजिकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी म्हटले. विधानसभेत (Maharashtra Assembly Winter Session) आरोग्य खात्याच्या संदर्भात उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले. राज्यात स्वमग्नता, गतिमंद, न्यूरोजिकल आजारी मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशभरात 0.1 टक्के मुले या आजारांनी त्रस्त आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येक 160 मुलांमागे एक मुलाला हा आजार आहे. परंतु शासकीय, जिल्हा व निमशासकीय रूग्णालयात या मुलांवरील उपचारांच्या सुविधा खूप कमी असल्याचे त्यांनी म्हटले. खासगी रुग्णांलयात उपचारासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या मुलांना उपचार मिळावेत, याकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शासनाचे लक्ष वेधले. यावरील चर्चेत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील जिल्हास्तरीय केंद्र उभारणीस बराच वेळ लागेल, तोपर्यंत राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या उपचारांचा समावेश करावा, अशी मागणी केली. उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हा निहाय उपचार केंद्र सुरू करण्यासोबतच या रुग्णांवरील उपचारांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल असे आश्वासन सभागृहाला दिले.