नागपूर: महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागपूर विभागात सर्वाधिक ९० टक्के कर्मचारी संपावर असल्याची माहिती मिळत (MSEDCL Employees Strike in Maharashtra) आहेत. काल मध्यरात्रीपासून या संपाला सुरुवात झाली असून ७२ तसांच्या या संपात राज्यातील ३१ संघटनांचा सहभाग असल्याची माहिती संघटनांनी दिली. या संपामुळे तुर्तास कुठेही विजेचे ब्रेकडाऊन निर्माण झाले नसले तरी दुपारनंतर परिस्थिती किचकट होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सरकारी वीज कंपन्या या सरकारच्याच अधिपत्याखाली राहाव्या, त्यांचे खाजगीकरण करण्यात येवू नये, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये, महानिर्मिती कंपनीच्या मालकीचे जलविद्युत केंद्र खाजगी भांडवलदारांना विक्री करता खुले करू नये.
तिन्ही वीज कंपन्यातील असलेल्या ४२ हजाराच्या वर रिक्त पदे भरावी यासह अनेक मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.
नागपूर विभागातच सर्वाधिक ९० टक्के महावितरणचे कर्मचारी संपावर आहेत. तर राज्यात सरासरी ८४ टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती आहे. औरंगाबाद विभागात ७९ टक्के तर कल्याण विभागातील ८६ टक्के, पुणे विभागातील ७६ टक्के कर्मचारी संपावर असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून चर्चेचे प्रस्ताव देण्यात आले असले तरी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्यास नकार दिल्याने आता राज्य सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे