मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही

0

मुंबई (Mumbai), १३ मे : मुंबईवर २५ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मुंबईकरांना, मराठी माणसाला काय दिले? निवडणुका आल्या की, मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे असे यांचे पोपट बोलू लागतात. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप ही तोडू शकत नाही. मराठी माणूस बेघर झाला त्याचं आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, असा सवाल करत मराठी माणसाच्या नावावर मतं मागून त्यालाच नागवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार आ. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते रविवारी विक्रोळी येथे बोलत होते. आ. मिहिर कोटेचा यांनी जे संकल्प केले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असून त्यांना बहुमताने खासदार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या, खा. मनोज कोटक, अविनाश महातेकर, आ. राम कदम, आ.पराग शाह आ. मनीषा कायंदे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)म्हणाले, सभेची गर्दी पाहता या मतदार संघाचा निर्णय झाला आहे. ही देशाची निवडणूक आहे. देशाला सुरक्षित करू शकेल असा नेता निवडायचा आहे. महाभारताच्या लढाईत एकीकडे पांडव आणि दुसरीकडे कौरव होते तशीच स्थिती आज आहे. आमचा महायुतीचा नेता ठरला आहे. इंडी आघाडीला तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत ते सांगा असे विचारले मात्र, ते सांगू शकले नाही. सकाळी नऊ वाजता पोपटलाल टीव्हीवर येऊन पाच वर्षात पाच प्रधानमंत्री करू असे म्हणतात. हे संगीत खुर्चीचा खेळ सुरू करणार आहेत. हा देश आहे, तुमची खाजगी मालमत्ता नाही, घंटा खुर्ची नाही. देशाला सुरक्षित ठेवू शकतो असा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही,निती नाही, ज्यांची नियत नाही असे सर्वजण एकत्रित आले आहेत. ते देशाला दिशा देवू शकत नाहीत. या देशाला समोर नेऊ शकत असेल त्या व्यक्तीचे नाव नरेंद्र मोदी आहे. मिहिर कोटेचा यांना दिलेले मत मोदींना जातं. इतर कुणाला मत दिलं तर ते राहुल गांधीला जातं. महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे.

याला मोदींचे मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. या डब्यात समाजातील सर्व घटकांना बसायला जागा आहे. सबका साथ सबका विकास म्हणून विकासाची ट्रेन पुढे जात आहे. दुसरीकडे डबेच उरले नाहीत. मनसेचं इंजिन आपल्या सोबत आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, स्टॅलिन, ममता दीदी सर्वजण मी इंजिन आहे असं म्हणतात. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त प्रियांका आणि सोनिया गांधी यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांना तर शरद पवार यांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे यांना जागा आहे, तुमच्याकरता जागा नाही. तुमच्याकरता जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. तुम्ही कमळाचे बटन दाबताच ईशान्य मुंबईची बोगी मिहिर कोटेचा मोदींच्या इंजिनला लावतील. मग आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही.

कफन घोटाळेबाज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोविड काळात लोक मरत असताना यांनी घोटाळे केले. कोविडमध्ये आपल्याच देशामध्ये लस तयार करण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात झाले. १४० कोटी भारतीयांना दोन वेळ मोफत लस दिली. त्यामुळे आज तुम्ही आम्ही सुखरुप आहोत. कफन, खिचडी चोर कोणत्या तोंडाने बोलत आहेत. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या लोकांनी कफनमध्ये, ऑक्सिजनमधे भ्रष्टाचार केला. जवळच्या लोकांना कंत्राट दिली गेली. ज्यांनी मुंबईकरांना फसवल, नागवलं त्यांना मुंबईकरांनी जाब विचारायला हवा.

मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन होईल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत ३३६ किमी मेट्रो जाळे तयार होत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनात परिवर्तन होईल. मुंबईतील रस्ते काँक्रीटचे होत आहेत. दरवर्षी रस्ते बनवून गरिबांचा पैसा लुटण्याचे काम झाले. उद्धव ठाकरेंनी तयार केलेला एक आयकॉनिक प्रकल्प उद्धव ठाकरेंनी दाखवावा. आमच्या सरकारने एसटीपी प्रकल्प सुरू केले. येणाऱ्या काळात दूषित पाण्याचा एक थेंब समुद्रात जाणार नाही असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा