काळजी घ्या… नागपूरची हवा प्रदूषित

0

नोव्हेंबरमध्ये तीसही दिवस प्रदूषणाचा मारा


नागपूर. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने सादर केलेला नोव्हेंबर महिन्यातील नागपूर (Nagpur) शहराच्या वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) चा अहवाल धक्कादायक आहे. शहराची हवा २४ दिवस प्रदूषित असल्याचे यातून निदर्शनास आले आहे. शहराचा एक्यूआय १२ दिवस १५० व १२ दिवस २०० च्यावर पोहोचला आहे. उरलेले चार दिवसही समाधानकारकच्या श्रेणीत नव्हता. वाहतुकीसह कचरा ज्वलनातून होणाऱ्या प्रदूषणासह नागपूरला लागून असलेले औष्णिक वीज केंद्र हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे. त्यातून कार्बन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे प्रदूषण वाढले आहे. मात्र, शहरात विकास प्रकल्प व इमारतींच्या बांधकामामुळे वाढलेला धूलिकणांचा स्तर हे प्रदूषणाचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. पीएम-२.५ व पीएम-१० हे प्रदूषक घटक धोकादायक ठरले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पट धूलिकण प्रदूषणाचा स्तर शहरात वाढला आहे.
नीरीचे वायू प्रदूषण विभागाचे प्रमुख डॉ. जॉर्ज यांच्या मते, हिवाळा सुरू होताच शहरात प्रदूषणाचा स्तर वाढतो. दिवाळीनंतरच यात वाढ होते. नोव्हेंबर-डिसेंबर आणि उन्हाळ्यात एप्रिलनंतर तो सर्वाधिक असतो. यासाठी वातावरणीय परिस्थिती जबाबदार असते. एमपीसीबीच्या नोव्हेंबर महिन्याच्या अहवालात हे स्पष्ट दिसून येत आहे.
एमपीसीबीच्या निर्देशाकानुसार, एक्यूआय ० ते ५० पर्यंत असेल तर सर्वोत्तम असेल. ५१ ते १०० पर्यंतचा एक्यूआय समाधानकारक आणि १०१ ते २०० पर्यंत मध्यम स्वरूपाचा असतो. मात्र, हा स्तरही लहान मुले, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींसाठी हानिकारक असतो. २०० च्यावर गेल्यास परिस्थिती वाईट होते. नोव्हेंबरमध्ये नागपूरच्या अहवालानुसार, महिन्यातील तब्बल १२ दिवस एक्यूआय २०० च्यावर होते. यातले तीन दिवस २५० च्यावर गेले होते. १२ दिवस तो १५० च्यावर व २०० च्या खाली गेला आहे. केवळ ४ दिवस एक्यूआय १५० च्या खाली आहे, पण समाधानकारक नाही. दोन दिवस डाटा उपलब्ध नाही. या प्रदूषणामध्ये धूलिकण म्हणजे पीएम-२.५ हे प्रदूषण सर्वांत परिणामकारक ठरले आहे.
विशेष म्हणजे हा डाटा केवळ सिव्हिल लाईन्सच्या जीपीओसमोरील मॉनिटरवरून घेतला आहे, जेथे वाहतूक कमी आणि झाडे अधिक आहेत. हिंगणा एमआयडीसी, वर्धा रोड, वाडी रोड, गांधीबाग, सीए रोड, पारडी या भागात परिस्थिती कितीतरी वाईट असण्याची शक्यता आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा