नागपूर (Nagpur) 5 ऑगस्ट :- आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर द्वारे चित्र प्रदर्शनी व गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नागपुरातील सुप्रसिद्ध नाट्य व सिने कलावंत देवेंद्र दोडके व शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय जठार यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर (Nataraj Art and Culture Centre) द्वारे गेल्या तीन वर्षापासून गुरुपूजनाची परंपरा सुरू आहे. सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केला. त्यामध्ये नृत्य विभागाच्या तीन विद्यार्थिनींनी भरतनाट्यम आणि कथक नृत्य प्रस्तुत केले. नाना मिसाळ यांनी नृत्यादरम्यान चित्र साकारले तर शिल्प विभागाचे प्रमुख मौक्तिक काटे यांनी गुरु व्यासांची मूर्ती साकारली. त्यानंतर समीर देशमुख यांनी बासरी वादन केले. कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, सचिव मंगेश फाटक व नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरचे समन्वयक अॅड. संजीव देशपांडे, प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास, प्राध्यापक सदानंद चौधरी व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.