नक्षलवाद आव्हान आणि उपाय!

0

 

नक्षलवादाची समस्या आपल्याला वर वर दिसते तशी साधी सोपी नाही. पुर्वीच्या राज्यकर्त्यांना, गुप्तहेर यंत्रणांना आणि पोलिस यंत्रणेलाही नक्षलवादाचं स्वरून नीट लक्षात आलं नाही किंवा नक्षलवादाची व्याप्ती, क्षमता जोखण्यात ते कुठतरी कमी पडले. अन्यथा नक्षलवाद इतका पसरलाच नसता. आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं सपाटीकरण करण्याची खोड आहे. म्हणजे एकसारख्या दिसत असलेल्या गोष्टी आपण एकाच पारड्यात टाकतो. म्हणजे हिरव्या रंगाचा हिरवा घोणस किंवा चापडा (Bamboo pit viper), हिरवी मिरची आणि हिरवी मटारची शेंग हे सगळे हिरवेच असले तरी त्यात फरक खुप आहे. त्यामुळे आपण दहशतवादी, आतंकवादी आणि नक्षलवादी यांच्यातील अंतर समजून घ्यायला हवं होतं. दहशतवादी किंवा आतंकवादाला धर्मांधतेची जोड आहे, त्यांची लढाई अन्यायाविरुद्ध असण्यापेक्षा इतर समाजसमुहाला क: पदार्थ समजून पायदळी तुडवण्याची किंवा एखादा देश बर्बाद करण्याची आहे. त्यामुळे ते धार्मिक कट्टरता निर्माण करून आपल्या कारवाया करतात. दुसरीकडे नक्षलवादी आधी अन्यायग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालतात. पण ही फुंकर त्या जखमा बऱ्या करण्यासाठी नसते, तर ते या फुंकरीतून अंगार फुलवतात. कळत-नकळत आपल्यावर अन्याय करणारे सरकार किंवा सरकारच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणा व त्यांच्याशी संबंधित प्रत्येकजण मग तो गावातला सावकार असो, गरीब आदिवासी असो, की सख्खा भाऊ असो त्या वर्गशत्रू ठरवून विलगीकरण केलं जातं. त्यासाठी नक्षलवादी माओच्या मानसशास्त्राचा खुबीनं वापर करतात.

आपण म्हणजे सातत्यानं पायदळी तुडवत आलेले लोकं आहोत, जोवर आपण आपल्याला तुडवणारे पाय, त्यावरचं धड आणि धडावरचं मुंडकं कापणार नाही तोवर हा वर्गसंघर्ष संपणार नाही, हेच ते गोरगरीबांच्या मनात बिंबवतात. मार्क्सची आहे रे आणि नाही रे या दोन वर्गातील वर्ग संघर्षाची थेअरी त्यांना कंठस्थच असते. आहे रे वर्गानं नाही रे वर्गावर केलेले अत्याचार खरेच असतात. सरकारी यंत्रणाही खुपदा चुका करता. पण नक्षलवादी हे अन्याय किंवा चुका आपल्या विचारांच्या भिंगातून जेव्हा सामान्यांना दाखवतात तेव्हा त्या कैकपटीनं मोठ्या दिसतात. त्यामुळे आहे ते सरकार, सगळी यंत्रणा समुळ नष्ट करायची, त्यासाठी सर्वहारा क्रांती करायची, मग जनतेचं राज्य येईल, सर्वांना समान वाटा मिळेल हे त्यांचं आवडतं तत्त्वज्ञान ते रात्रंदिवस घोकत असतात. पण खरी मेख इथच आहे. नक्षलवाद्यांची तथाकथिक क्रांती यशस्वी झाली आणि त्यांनी एखाद्या देशावर ताबा मिळवला तर तो देश ते कसा चालवतील ? क्रांतीचे बिगुल वाजवून पाऊस पाडतील की शेतात पुन्हा बंदुकांची पेरणी करून नवा वर्गशत्रू शोधत फिरतील ? हे प्रश्न त्यांना कुणीच विचारत नाहीत. मुळात नक्षलवादी लोकशाहीला कितीही शिव्या देत असले, तरी एखादा देश सुरळीत, शांततेत आणि आनंदात चालविण्यासाठीचा काही एक फाॅर्म्युला त्यांच्याकडे नाही. विध्वंसाला शांततेचं वावडं असतं.

नक्षलवाद्यांचं फावतं कुठं तर सरकारी यंत्रणा जेव्हा त्यांच्यासारखीच वागायला लागते तेव्हा. म्हणजे बंदुकीचं उत्तर बंदुकीनं. त्यासाठी सलवा जुडूमसारखे प्रयोगही झाले. पण कुत्रा माणसाला चावला म्हणजे माणूस काही कुत्र्याला चावत नाही. पिसाळलेला चावरा कुत्रा मारायलाच हवा. पण त्याआधी तो पिसाळेला आहे, आपल्यासाठी घातक आहे हे लोकांना पटवून द्यायला हवं. म्हणजे जनजागृती करायची. सुरवातीला नेमकी इथेच गोची झाली. नक्षली काय जंगलातले उंदीरच. असतील शे पाचशे, टाकू संपवून, अशा भ्रमात सरकार राहिले आणि नक्षलवादाने दंडकारण्याचा भाग व्यापत पश्चिम बंगालपासून मध्य भारतातल्या अनेक भागांत आपलं बस्तान बसवलं. बरं नक्षलवादी केवळ दऱ्या, डोंगरात, जंगलात बंदुका घेऊन फिरतात हे समजणही चुकीचं होतं. जंगलात फक्त मोजके नक्षलवादी असतात. पण नवे नक्षलवादी घडविणारे अनेक (यात उच्च शिक्षितही खुप आहेत) महानगरांमध्ये वावरत असतात. त्यामुळे नक्षलवादाचा नाग दोन फणेधारी आहे. म्हणून जंगलातले नक्षलावादी मारून उपयोग नाही, त्याच्या निर्मितीचे स्त्रोत शोधून ती बिळं बुजवणं गरजेचं आहे. शिवाय स्वातंत्र्यानंतर अजुनही सरकारी यंत्रणांनी सामान्य माणसाला दुखावण्याचेच काम केले. याचा अनुभव घ्यायचा असेल, तर कुठल्याही सरकारी कार्यालयात एखादा दाखला मिळवण्यासाठी जा…तोंडातून पानाची पिंक थुंकत तुमच्याकडे तुच्छतेनं बघणारा बाबू हा या निर्ढावलेल्या सरकारी यंत्रणेचं प्रतीक आहे.

जिथे बाबूगिरी अशी तर पोलिसगिरी सांगायलाच नको. पण महाराष्ट्रात हे कुणी ओळखलं असेल तर ते तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी. नक्षलवाद्यांना बंदुकीनं उत्तर देतानाच विकासकामांचा वेग वाढवणं, दुर्गम, अतिदुर्गम भागांतील आदिवासी व इतर समाजाला मुख्य प्रवाहात आणणं, खाकी वर्दीतल्या रूबाबदार पण भितीदायक वाटणाऱ्या पोलिसांकडून नागरिकांच्या काळजाला हात घालतील असे उपक्रम राबवून घेणं, हे सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काम करत आहे हे त्यांना कळवत राहणं, त्यांचा विश्वास जिंकणं, सरकार व पोलिसांची कल्याणवृत्ती आणि नक्षलवाद्यांची विध्वंसक वृत्ती विविध माध्यमातून जनतेला दाखवत राहणं, हे सगळं त्यांनीच सुरू केलं. आता सगळ्यांना हे कळू लागलं आहे. नक्षलवाद एखाद्या विषाणूसारखा आहे. कोणताही विषाणू आधी आपल्या शरीरातील एखाद्या पेशीला चिकटतो, मग त्यात आपले जनुकं सोडून त्या पेशीची यंत्रणा ताब्यात घेतो मग आपलं वेगानं पुनरुत्पादन करतो. आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला हा विषाणू आधीच ओळखता आला तर त्याला गारद करणं सोपं होतं. अन्यथा तो विषाणू आपला प्राणही घेऊ शकतो. आता आपली इम्युन सिस्टीम या लढ्याला छान सरावली आहे. कसं लढायचं हेही शिकली आहे. आज नक्षलवाद्यांवर जो विजय मिळतोय तो केवळ बंदुकीनं नाही, तर पोलिसांनी आपल्या हातात घमेले, फावडे घेऊन त्यांना रस्ते बांधून दिले, पूल बांधून दिले, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या, जनजागरण मेळाव्यातून त्यांना सरकारी दाखले सहज उपलब्ध करून दिले, आरोग्य तपासणी, शेतीचे नवे तंत्र अशी अनेक प्रकारची मदत केली तेव्हा कुठे नक्षलवादाचा विषाणू जनपेशीपासून हळूहळू विलग होऊ लागला आहे. पण दंगल चित्रपटात आमिर खानचा एक गाजलेला संवाद आहे “अभी ज्यादा खुश होने की जरूरत नही”, हे कायम लक्षात ठेवावं लागेल. आपण योग्य दिशेनं जात आहोत, त्यात सातत्य ठेवावं लागेल. एखादा मिलिंद तेलतुंबडे, नर्मदा अक्का मेले, प्रा. साईबाबा, कोबाड गांधीसारखे तुरुंगात गेले म्हणजे विजयाचे नगाडे वाजविण्याची गरज नाही. जोवर शेवटचा नक्षली आहे, त्याच्या मनात, बुद्धीत माओ आहे आणि सामान्यांवर अन्याय होत आहे तोवर नक्षलवादाचा नाग कधीही फणा उगारू शकतो.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा