सूरजागड प्रकल्पाच्या विस्तारावरून नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा

0

नागपूर: नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सुरजागड येथील लोहखनिज खाणीचा विस्तार त्वरीत रद्द करण्यात यावा, अशा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे. राज्य सरकारने सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द न केल्यास आदिवासींचे हित जोपासणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा, असे आवाहन प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवाद) (CPI Maoist stand on Surjagarh Project) पश्चिम सब झोनल ब्यूरोने केले आहे. या विस्तारित प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. चाळीसहून अधिक गावे प्रदूषणामुळे प्रभावित होणार आहेत. खाणीतून निघणाऱ्या ट्रकमुळे अनेक रस्ते अपघात होत आहेत, असा दावा नक्षलवाद्यांकडून करण्यात आलाय.


प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवाद) ने आपल्या पत्रकात नमूद केले आहे की, सुरजागड या ठिकाणी आदिवासींचे पूजा स्थळ असतानाही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता 2014 मधील भाजप सरकारने स्थानिक आदिवासींच्या तत्कालीन जनसंघर्ष चिरडून टाकत सुरजागड खाणीत खोदकाम सुरू केले होते. सुरजागड खाणीमुळे शेतकऱ्यांचे पीक खराब होत असून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिवाय खाणीतून निघणाऱ्या ट्रक्समुळे अनेक रस्ते अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे या विरोधात जन संघर्ष उभारण्याची गरज असून त्यात सर्व बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ता, वकील, स्थानिक जनता यांनी समोर येऊन आंदोलन उभे करावे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीलाही नक्षलवाद्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून लक्ष्य केले आहे. तेंदूपानावरील जीएसटीमध्ये सूट देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. ओडिसा सरकारनेही तशीच मागणी केली आहे. मात्र काल झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 48 व्या बैठकीत या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.