नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेतही आक्रमक भूमिका घेतली. कर्नाटक विधानसभेने महाराष्ट्राच्या विरोधात ठराव घेतला असताना महाराष्ट्र विधानसभेत अद्याप असा ठराव का आलेला नाही, असा प्रश्न उपस्थित करताना विरोधकांनी सरकारवर टीका केली.
तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मान खाली घालून उभे आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती. विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही”, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on Maharashtra-Karnataka Border Issue) यांनी यावेळी विरोधकांना सुनावले. फडणवीस म्हणाले, “जसे कर्नाटक म्हणतेय तसेच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालय किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू”. मुख्यमंत्री नागपुरात येताच आज किंवा उद्या सीमा प्रश्नावरील ठराव निश्चितपणे आणला जाहीर, असे आश्वासही फडणवीस यांनी यावेळी दिले.
प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते, त्याचे काय झाले? अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल उपस्थित केला. कर्नाटकने या मुद्यावर ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने कर्नाटक सरकारला दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचे नाही. आपल्याला एक राहायचे आहे. कर्नाटकविरोधात ठराव आणण्याचे आपले ठरले होते. मागच्या आठवड्यातलं वातावरण जरा गंभीर होतं. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आले आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. ते दुपारी परतणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात महाराष्ट्र तसूभरही मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“आम्हाला मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही”.. फडणविसांनी विरोधकांना सुनावले
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा