Rahul Narwekar अपात्रतेच्या मुद्यावर शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीसा, कार्यवाही सुरु

0

मुंबई (Mumbai) आमदारांच्या अपात्रतेच्या प्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी कार्यवाही सुरु केली असून शिवसेनेच्या ४० आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आलीय. अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाकडून विधीमंडळास शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. (Disqualification Petition of 16 Shiv Sena MLA`s )
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल असलेली आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका निकालात काढण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. ठाकरे गटातून शिंदेंकडे गेलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश आहे. विधान सभा अध्यक्षांनी विशिष्ट वेळेत याचिका निकाली काढणे बंधनकारक असल्याने शिंदेसह १६ आमदारांचे भवितव्य धोक्यात आले आहे.