“भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली होती…”, शरद पवारांची कबुली

0

येवला- भाजपसोबत (BJP) जाण्याची चर्चा झाली होती, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar on alliance talks with BJP) यांनी दिली आहे. अशी चर्चा झाल्याचे मान्य करताना पवार यांनी सांगितले की, आमच्या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असल्याने ती चर्चा पुढे जाऊ शकली नाही. दरम्यान, पवारांनी निवृत्तीच्या मुद्यावरही भाष्य केले. मी निवृत्त का व्हायचे, असा सवाल करून पवार म्हणाले की, मी अजूनही काम करु शकतो. माझ्यात ती क्षमता आहे. कोणत्या वयात निवृत्त व्हायचे व कुठे थांबायचे, हे मला माहिती असल्याचे पवार म्हणाले. अलिकडेच अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करताना त्यांना निवृत्त होण्याचा सल्लाही दिला होता.

शरद पवार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात पोहोचले आहेत. तेथे ते जाहीरसभा घेणार आहेत. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, सातत्याने माझ्या वयाचा संदर्भ काढला जातोय. मोरारजी देसाई कोणत्या वयात पंतप्रधान झाले होते हे देशाला माहिती आहे. मात्र, मला आता पंतप्रधान व्हायचे नाही किंवा मंत्री देखील व्हायचे नाही. मला संघटनेचे काम करायचे आहे. त्यामध्ये वयाचा प्रश्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मला नवी पिढी तयार करायची आहे. नवे नेतृत्त्व तयार करायचे आहे, हे माझे काम आहे आणि मी ते करत राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.