महावितरण अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

0

नागपूर(Nagpur) दि. 28 नोव्हेंबर 2024: – महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अभय योजना 2024 नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकार माफ़ करण्यात येत आहे, या योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील अर्थातच विदर्भातील तब्बल 17 हजार 917 ग्राहकांनी 19 कोटी 37 लाख 32 हजार रुपयाचा भरणा करून थकबाकीतून कायमची मुक्ती मिळविली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 4 हजार 934 ग्राहकांचा समावेश आहे.

31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. या योजनेत वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येत आहे. या योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळत असून एक रकमी थकित बिल भरणा-या लघुदाब ग्राहकांना 10 तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सवलत दिल्या जात आहे. या योजनेची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत असल्याने थकीत वीज बिलाचा भरणा करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

विदर्भातील 17 हजार 163 वीज ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक वीज ग्राहकांना www. mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून तसेच. महावितरणच्या मोबाईल ऍपवर योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912  किंवा 18002333435 किंवा  18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आणि महावितरण कार्यालयात संपर्क करून याबाबत माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्वावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी अभय योजना आहे. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

अभय योजनेतील लाभार्थ्यांचा जिल्हा निहाय तपशिल

जिल्हा लाभार्थी ग्राहक संख्या भरणा केलेली रक्कम (लाखात)
अकोला 1248 134.39
बुलढाणा 2998 257.76
वाशिम 955 85.26
अकोला परिमंडल 5201 477.41
अमरावती 1119 138.72
यवतमाळ 1068 96.15
अमरावती परिमंडल 2187 234.87
चंद्रपूर 943 69.27
गडचिरोली 1893 72.64
चंद्रपूर परिमंडल 2836 141.91
भंडारा 678 33.11
गोंदीया 1007 65.46
गोंदीया परिमंडल 1685 98.57
नागपूर 4934 929.86
वर्धा 920 54.7
नागपूर परिमंडल 5854 984.56
नागपूर परिक्षेत्र 17763 1937.32