विश्ववात्सल्य आणि भाव काव्यात्मकतेमुळे मराठी अभिजात

0

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अभिजात मराठी : पैलू आणि पृथगात्मता या विषयावर व्याख्यान

नागपूर, २८ जानेवारी : विश्ववात्सल्य, तादात्म्य, आत्मनिष्ठा आणि भाव काव्यात्मकता या गुणांमुळे मराठी भाषा अभिजात ठरते. अभिजात भाषेत असणारा साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम मराठीत आढळतो. भाषेचे प्रवाहीपण आणि निरंतरतेत अभिजात गुणधर्म दडलेला आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी येथे केले. विदर्भ साहित्य संघ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अभिजात मराठी : पैलू आणि पृथगात्मता हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. मंचावर ग्रंथालयाचे संचालक डॉ. विवेक अलोणी उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आज, मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला.

डॉ. राजेंद्र नाईकवाडे पुढे म्हणाले की, मराठी अभिजात होतीच पण आता मापदडांच्या सिद्धतेने तिला अभिजात दर्जा लाभला आणि मराठी संवर्धनासाठी प्रेरक शक्ती निर्माण झाली. मराठीचे खरे ग्रंथोपजीवी भक्त राजकीय पद्धतीने विचार न करता हे मोठेपण जपण्याचे दायित्व निभवतील ही खात्री आहे. प्रमाण भाषेतल्या साहित्यालाच अभिजात म्हणावे का, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. नाईकवाडे यांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळीतून मराठीचे अभिजातपण दर्शविणाऱ्या ज्ञानदेवांपासून ते प्राचीन काव्याचे सकस अर्वाचीकरण करणाऱ्या राजा बढे तसेच ज्ञान परंपरेतील सातत्य राखणारे विनोबा यांच्या साहित्याचा सखोल परामर्श केला. अभिजातपणाच्या राजमार्गासाठी कुलीनपणाची प्रौढी आणि शासन पांडित्याचा अभिमान बाळगू नये असे आवाहनही त्यांनी केले. शोकाचा श्लोक होण्याची परंपरा ज्या चोखोबांच्या काव्यात होती त्यात वाड्:मयीन अभिजातता दिसते. कलात्मक, काल्पनिक, ऐतिहासिक, पौराणिक साहित्यातही मराठी उठून दिसते. मराठीतले वेगळे आकृतीबंध हे आपल्या भाषिक अस्मितेची पुनर्बांधणी आहे. आशय आणि आकृतीबंधातून जीवनमूल्यांचे प्रगटीकरण मराठीचे वैशिष्ट्य आहे. संत नामदेव ते मर्ढेकरांच्या प्रतिमासृष्टीचाही तौलानिक उहापोह त्यांनी याप्रसंगी केला. भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचा अंत:प्रवाह आधुनिक काळाला जोडतो, परिणामी नवे जुने साहित्य नाते अधिक सजीव, चैतन्यमयी होते, असे ते म्हणाले.
मराठी भाषेची प्राचीनता सर्वज्ञातच आहे. म्हणून त्याविषयी आपुलकी, जिव्हाळा, सकारात्मक दृष्टीकोन बाळगत, युवा पिढीने अशा व्याख्यानमालेची शिदोरी जमवावी, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. अतिथींचे स्वागत कवी सुनील शिनखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विवेक अलोणी यांनी केले. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सहायक डॉ. मोनाली पोफरे यांनी मानले. श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली.