
नागपूर (NAGPUR) : सना पंडित यांच्या पुस्तकात निसर्ग आणि स्त्री पुरुष संबंधाच्या मिलनोत्सुक धारा तसेच प्रकृती व पुरुषाच्या उत्कट प्रेमाची अवस्था व सृजनाचा स्थायी भाव आहे, असे प्रतिपादन एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अतुल वैद्य यांनी येथे केले. विदर्भ साहित्य संघ आणि वर्णमुद्रा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज, गुरुवारी सना पंडित यांच्या अंतरंग (ललित) आणि अभिसारिका (दीर्घकाव्य) या दोन पुस्तकांचे थाटात प्रकाशन झाले.
त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. वि. सा. संघाच्या अमेय दालनात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, डिजिटल तरुण भारतचे संपादक शैलेश पांडे, वि. सा. संघाच्या कार्यकारीणी सदस्य संयोगिता धनवटे, वर्णमुद्राचे मनोज पाठक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश एदलाबादकर आणि प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे उपस्थित होते.
शुभेच्छा देताना शैलेश पांडे म्हणाले की, संवेदनशील माणसाला भरती आल्यावर असे मनस्वी, तरल साहित्य घडते, त्याचा आस्वाद घेऊन लेखकाच्या आकलनाच्या आसपास पोहचावे. वाचकांना भुरळ पाडणाऱ्या या पुस्तकांत मनाच्या प्रवासाचा उत्तम धांडोळा आहे.
रवींद्र शोभणे म्हणाले की, या साहित्यात स्वच्छंदवाद, निसर्गसंबंधित शारीर भावना, दैहिक फलित व सर्जन प्रक्रियेची महत्वाची नोंद आहे.
संयोगिता धनवटे यांनी, अंतरंगातले जग विलक्षण असून, या पुस्तकांत स्त्रीचे दातृत्व रूप आहे, असे उद्गार काढले.
अंतरंग या संग्रहावर भाष्य करताना डॉ. राजेंद्र नाईकवाडे म्हणाले की, निकोप स्त्रीकेंद्री अंगाने जाणाऱ्या या ग्रंथाची अभिव्यक्ती आत्मनिष्ठाप्रधान, रूपकप्रधान आणि घटनाप्रसंगप्रधान या रूपबंधात आहे. स्त्री पुरुष नात्याचा आयाम टिपणारे हे पुस्तक वाचनीय आहे. त्यात विचारांच्या व्यापकतेतून आदिम भावबंधाकडे जाण्याचा प्रयत्न आहे.
अभिसारीका वर भाष्य करताना प्रकाश एदलाबादकर म्हणाले, यात सोळा शृंगार करून प्रियकराला भेटणाऱ्या अभिसारिकेचे लघुकाव्यात्मक प्रासादिक, प्रवाही दर्शन आहे. हे काव्य शृंगार, कामरसाच्या पुरातून मातृत्वाच्या साफल्याकडे व संस्कृत महाकाव्याकडे वळते.
सहअनुभूतीतून आलेल्या माझ्या लिखाणाला निसर्गाचा मोठा आधार आहे. मनाच्या भावनांचा निचरा झाल्यानंतरचा हा आनंदसोहळा आहे, असे मनोगतात सना पंडित म्हणाल्यात .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले. अतिथींचे स्वागत समीर आणि साहिल पंडित, धनश्री पाटील यांनी केले. याप्रसंगी मुखपृष्ठकार धनंजय गोवर्धने, पुस्तक निर्मिती सहायक भाग्यश्री बनहट्टी, सावन धर्मापुरीकर, देवेंद्र फुनसे, प्रफुल्ल शिलेदार, मोहन पांडे, प्रदीप मोहिते यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होती.