आघाडीसाठी प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला पुन्हा साकडे

0

मुंबई MUMBAI -इंडिया आघाडीत समावेश न झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या चिंता वाढल्या आहेत. (Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar) मागील वर्षभरापासून आंबेडकरांचे विरोधकांच्या आघाडीत प्रवेश मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यांना दाद दिली जात नसल्याने अस्वस्थ असलेल्या आंबेडकरांनी आता काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला आहे. काँग्रेसने सात दिवसांत निर्णय न कळविल्यास आम्ही लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करु, असा इशारा आंबे़डकरांनी दिलाय.

प्रकाश आंबेडकरांच्या वतीने यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना ई-मेल पाठविण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी, वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना हा ई-मेल पाठविला आहे. त्यात इंडिया आघाडीच्या बैठकीचे वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नव्हते, हे स्पष्ट करण्यासह वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचे सांगण्याचा प्रयत्नही त्यात करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, भाजप व आरएसएसच्या विचारसरणीमुळे देशाचे नुकसान होत आहे. या विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास काँग्रेस खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. आमचे दरवाजे खुले आहेत”, असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.