पुणे: पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव शिवाजी उत्तम गरड असे असून त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कोठडीतील मृत्यूप्रकरण असल्याने या घटनेचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आलाय.
या आरोपीने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुणे पोलिसांच्या युनिट सहाच्या पथकाने शिवाजी गरड याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. काल रात्री त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी तेथे तैनात कर्मचाऱ्याने लॉकपची तपासणी केली असता शिवाजी गरड हा गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्याने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून त्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून या घटनेची माहिती घेतली.