अमरावती : विदर्भातील विविध प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, प्रकल्पग्रस्तांचे सर्टिफिकेट देऊन संबंधितांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्याय यावे या मागणीसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने मागील आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. तरीदेखील विधिमंडळ अधिवेशनात एकाही आमदाराने प्रकल्पग्रस्ताचा मुद्दा मांडला नाही. त्यामुळे बुधवारी अमरावतीच्या राजकमल चौकात प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत ‘आमदार,खासदार जागे व्हा’ अशा घोषणा देत जवाब दो आंदोलन करत आमदार व खासदारांचा निषेध केला. गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहेत मात्र तरी देखील आमदार खासदार मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला यापुढेही लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला.