विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड

0
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड

मुंबई, ९ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहूल नार्वेकर यांची निवड करावी, यासाठी प्रस्ताव मांडला. त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानाने एकमताने विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली.

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सभागृहात अभिनंदन केले. ते म्हणाले की, मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपली निवड झाली. त्याबद्दल विरोधी पक्षाचे सदस्य आणि गटनेत्यांचे आभार मानतो. राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री होते, त्यातला एक वकील होता, तुमच्यासारखा निष्णात वकील अध्यक्षांच्या खुर्चीत बसला, या खुर्चीला तुम्ही न्याय द्याल शंका नाही, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते. सयाजी सिलम हेही दोन वेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळाले आहे.

आजवरचे विधानसभा अध्यक्ष (संयुक्त महाराष्ट्र)

अध्यक्षांचे नाव कार्यकाळ राजकीय पक्ष

सयाजी सिलम (काँग्रेस) १ मे १९६० ते १२ मार्च १९६२ बाळासाहेब भारदे (काँग्रेस) १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७बाळासाहेब भारदे (काँग्रेस) १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२बॅ. शेषराव वानखेडे (काँग्रेस) २२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७ बाळासाहेब देसाई (कॉंग्रेस) ४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८शिवराज पाटील (कॉंग्रेस) १७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९प्राणलाल व्होरा (कॉंग्रेस) १ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८० शरद शंकर दिघे (कॉंग्रेस) २ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५शंकरराव जगताप (कॉंग्रेस) २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९० मधुकरराव चौधरी (कॉंग्रेस) २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५ दत्ताजी नलावडे (शिवसेना) २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९अरुण गुजराथी (राष्ट्रवादी काँग्रेस) २२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टोबर २००४बाबासाहेब कुपेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) ६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४हरीभाऊ बागडे (भाजप) १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९नाना पटोले (कॉंग्रेस) १ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१ राहुल नार्वेकर (भाजप) ३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२

कोण आहेत नार्वेकर?

कुलाबा (मुंबई) या विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. ३ जुलै २०२२ रोजी ते विधानसभा अध्यक्ष झाले. विधानभवनची इमारत ही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच येते. ते बी.कॉम. एल.एल.बी. आहेत. पूर्वी एकदा विधान परिषदेचेही ते सदस्य होते. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचे विधी सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला होता.