आता पुन्हा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा

0

 

मुंबई : राष्ट्रवादीतील फूट आणि अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर आता मनसेमध्ये अस्वस्थता असून पुन्हा एकदा राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. या दोन नेत्यांनी एकत्र यावे, अशा पोस्ट सोशल मिडियावर सुरु झालेल्या आहेत. मनसेच्या बैठकीतही उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची मागणी काही नेत्यांनी केली असल्याने आता महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा परिणाम म्हणून राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार की काय, (Uddhav and Raj Thackeray) असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यात रविवारी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुढे कसा न्यायचा, यावर चर्चा करण्यासाठी आज मनसेची बैठक पार पडली. राज ठाकरे यांनीच ही बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी राज ठाकरेंनी नेत्यांची मते जाणून घेतली. काही नेत्यांनी लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला पाहिजे, असे मत व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. 2017 च्या महापालिका व विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यान, राज ठाकरे यांनी अद्याप कुठलेही भाष्य केले नसून आपण मेळाव्यात त्यावर भाष्य करु, असे म्हटले आहे.