Home Artical Blog जन्मभूमी के काम न आये, उसकी व्यर्थ जवानी है!

जन्मभूमी के काम न आये, उसकी व्यर्थ जवानी है!

0

जन्मभूमी के काम न आये, उसकी व्यर्थ जवानी है!

सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.

 

| भाग 4 |

जन्मभूमी के काम न आये, उसकी व्यर्थ जवानी है। जिस हिंदू का खून ना खौले, खून नहीं वो पानी है! महाविद्यालयीन जीवनातच मला श्रीरामजन्मभूमी मुक्ती संग्रामात सक्रिय भाग घेता आला यासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. स्वातंत्र्योत्तर काळात देशात मोठ्या वैचारिक युद्धाची ही नांदी होती. सत्ता स्वार्थासाठी देशहित, देशाभिमान, भारतीय संस्कृती खुंटीला टांगून गठ्ठा मतांसाठी टोकाचे लांगुलचालन केले जात होते आणि छद्म धर्मनिरपेक्षतेचे ढोल वाजवले जात होते. स्वतःला डावे, समाजवादी, पुरोगामी, बुद्धिजीवी म्हणवणारे एकत्र येऊन बाबराच्या भारतीय संस्कृतीवर केलेल्या आक्रमणाला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी जिवाच्या आकांताने श्रीरामाला विरोध करत होते.
रामभक्तांची टर उडवली जात होती. देशभर होणाऱ्या आंदोलनात रामभक्तांवर केसेस दाखल करणे, अडवणूक करणे, त्यांना जातीय किंवा सांप्रदायिक ठरवून हिणवणे यात हा कंपू एकमताने एकत्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या पोटात वाघनखं घालून कोथळा बाहेर काढला, हे दृश्य सार्वजनिकरित्या दाखवण्याची मुभा नव्हती. एखाद्या मिरवणुकीत असे दृश्य दाखवले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची उदाहरणे आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जाहीरपणे मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्राच्या जन्माचे पुरावे मागण्यापर्यंत मजल गेली होती. आज रामलला विराजमान सोहळ्यासाठी निमंत्रणाची वाट पाहणारे श्रीरामजन्मभूमीवर शौचालये बांधा, असे म्हणून भारतीय अस्मितेला अपमानित करत होते. पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून दारू झोकणारे कथित बुद्धिजीवी रामाचे अस्तित्वच मानायला तयार नव्हते.
इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झालेला नव्हता. प्रिंट मिडियामध्ये कम्युनिस्टांचा बोलबाला होता. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाला नख कसे लागेल यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले जात होते. आंदोलनात फूट पाडण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधल्या जात होत्या. रस्त्यावर बिस्कीट, पोळ्या फेकायच्या. एखाद्या रामभक्ताने त्या पायाखाली येऊ नये म्हणून बाजूला ठेवण्यासाठी एखादे बिस्कीट उचलले तर त्याचा फोटो छापून अयोध्येत रामभक्तांवर भीक मागण्याची पाळी, म्हणून बातम्या छापायच्या. एखादा साधू विरोधात उभा करून त्याच्या मुलाखती छापायच्या. विश्व हिंदू परिषदेवर निधी संकलनावरून आरोप करायचे. नेत्यांचे व्यंगचित्र छापायचे. यात भारतीय श्रद्धेला तडा जाईल, याचा विवेक न ठेवता कथित बाबरी मशीद वाचवण्यासाठी जीवाचा आकांत सुरू होता. मात्र, या सर्व कारस्थानांमुळे भारतीय जनमानस आपल्या संकल्पावर अधिक दृढ होत होते.
देशातील तरुण हॅलो, हाय ऐवजी जय श्रीराम म्हणू लागला.
संघटन का महामंत्र ले तरुणाई का ज्वार उठा
युग से सोये सुप्त हृदय में राष्ट्र भक्ती का ज्वार उठा
हिंदुहृदय ललकार उठा !
या गीताच्या ओळी म्हणत, गळ्यात रामनामाचा शेला टाकून आम्ही एकच ध्यास घेतला होता. 30 ऑक्टोबर 1990 कारसेवा करण्याचे ठरले. अयोध्या आंदोलनाचे महानायक अशोकजी सिंहल देशभर प्रवास करत होते. एका सकाळी अशोकजी बडनेरा रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या ट्रेन ने प्रवास करण्याची वार्ता आम्हाला समजली. माझ्यावर बडनेरा रेल्वे स्थानकावर अशोकजींचे स्वागत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी गावात लाऊडस्पीकर फिरवला. ज्या जागेवर अशोकजी प्रवास करीत असलेल्या गाडीचा डबा थांबणार तिथेच आम्ही छोटा मंच उभा केला. प्लॅटफॉर्मवर लाऊडस्पीकर लावला. ट्रेन 5 मिनिटे थांबत होती. स्टेशन मास्तरला पटवून ट्रेन 15 मिनिटे सुटणार नाही, याची व्यवस्था निवडक बजरंगींनी केली. अशोकजी गाडीतून उतरताच त्यांनी उपस्थितांना संबोधित करण्याची व्यवस्था केली. भरपूर लोक जमले होते. अशोकजींचे छोटेखानी भाषण झाले. बडनेरा रेल्वे स्थानक ‘मंदिर वही बनायेंगे’ च्या घोषाने दुमदुमले. आमच्या उत्साहाला उधाण आले होते. ‘जो नही राम का, वो नही काम का’ हे मन:पटलावर अधोरेखित झाले होते. काही दिवसांनी आम्ही लालकृष्णजी आडवाणी यांची देखील बडनेरा रेल्वे स्थानकावर अशीच छोटेखानी सभा घेतली.
श्रीरामशिला पूजन, श्रीराम ज्योत यात्रा असे कार्यक्रम गल्ली बोळात राबवले गेले. सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद दिवसागणिक वाढतच होता. अभी नही तो कभी नही, असेच प्रत्येक तरुणाने आपल्या मनावर बिंबवले होते. आपले करिअर, आपला व्यवसाय दावावर लावून असंख्य तरुणांनी श्रीराम जन्मभूमी मुक्तीचा ध्यास घेतला होता.
या संपूर्ण चळवळीचा परीक्षेचा क्षण म्हणजे कारसेवा होती. राजीव गांधी, मुलायमसिंह, शरद पवार, लालूप्रसाद यादव, मायावतीजी यांच्यासह अनेक दिग्गज आणि सत्ताधारी आंदोलन चिरडण्यासाठी एकवटले होते. त्यांच्याजवळ शासकीय यंत्रणा होती. रामभक्तांजवळ होता केवळ निर्धार ! मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म जिथे झाला त्याच जागेवर भव्य मंदिर उभे व्हावे म्हणून कारसेवेसाठी अयोध्येत पोहचायचेच हा आम्ही देखील संकल्प केला.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827
(प्रतिदिन अखबार लेखमाला)