छद्म धर्मनिरपेक्षतेला सणसणीत चपराक!

0
सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.
| भाग 2 | 
 

छद्म धर्मनिरपेक्षतेला सणसणीत चपराक !

मुलायमसिंहांचा अहंकार रामभक्तांनी केला ध्वस्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या संदीपनी आश्रमात स्वामी चिन्मयानंद, एसएस आपटे, मास्टर तारा सिंह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह अनेक धर्ममार्तंडांच्या उपस्थितीत 21 मे 1964 रोजी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. नंतर विहिंपच्या मंचावर कुंभमेळ्यात सर्व शंकराचार्य एका व्यासपीठावर आले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्व धर्मचार्य एका व्यासपिठावर येऊन त्यांनी दिलेली ‘हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिंदू पतितो भवेत् । मम दीक्षा धर्म रक्षा, मम मंत्र समानता।, ही घोषणा समग्र हिंदू समाजासाठी ऐतिहासिक स्वरूपाची ठरली. आम्ही सर्व भारतमातेचे सुपुत्र या नात्याने एकाच उदरातून जन्मलो आहे. परिणामी आमच्यात कोणीच उच – नीच नाही. आमचा कोणीच बंधू अस्पृश्य असू शकत नाही. असा हा सामाजिक समरसतेचा महान व क्रांतिकारी मंत्र जगातील हिंदूंना दिल्या गेला. आम्ही समतेचा मंत्र स्वीकारून धर्माची रक्षा करण्याचा हा संकल्प होता.
धर्मरक्षक श्रीरामचंद्राने धर्माची रक्षा करण्यासाठी सर्व समाजघटकांचे संघटन बांधले. वनवासी, गिरीकंदरात वसलेले, मागासलेले सर्व जातीसमूह जोडले. शबरीची बोरं आणि अहल्या उद्धार हे उदाहरणं कायम आदर्श स्वरूपी आहे. त्या रामाच्या जन्मभूमीवरचा कलंक पुसण्याचा निर्णय हिंदू समाजाने घ्यावा म्हणून विहिंपने देशातील सर्व साधुसंत एकत्र आणले. समग्र हिंदू समाजात एक चेतना उभी झाली. राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या श्रीरामजन्मभूमी मुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले गेले. देशातील सत्ताधाऱ्यांनी गठ्ठामतासाठी स्वीकारलेले छद्म धर्मनिरपेक्षतेचे आणि लांगुलचालनाचे राजकारण हाणून पाडण्याचा संकल्प भारतीय जनतेने केला. 1949 पासून  तत्कालीन सरकारने श्रीरामललाच्या दर्शनाला बंदी घालून श्रीरामजन्मभूमीला कुलूप ठोकले होते. विहिंपने ‘श्रीरामजन्मभूमी का ताला खोलो’ आंदोलन सुरू केले. हिंदूशक्तीचा अल्पावधीतच विजय झाला. सत्ताधाऱयांना नमावे लागले. आणि 1986 साली न्यायालयाने श्रीरामजन्मभूमीची कुलूप तोडून हिंदूंना श्रीरामललाच्या पूजनाचा आणि दर्शनाचा मार्ग मोकळा करून दिला.
 श्रीरामजन्मभूमी मुक्ति साठी देशभर जनजागरणाचे कार्यक्रम राबवले गेले. गंगामाता भारतमाता यात्रा, श्रीराम ज्योत यात्रा, श्रीराम शीला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले. पुढचा टप्पा श्रीरामजन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरले.
देशभरातील हिंदूंमध्ये प्रचंड उत्साह होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘अयोध्या मे परिंदा भी पर नही मार सकता, अशी घोषणा करून सर्व उत्तरप्रदेश मध्ये सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले. वीस हजार सशस्त्र जवान तैनात केले. ३० ऑक्टोबर १९९० हा दिवस कारसेवेचा निश्चित झाला होता. शंभर, दोनशे किलोमीटर पायी चालत, मुलायमसिंहांच्या जबरदस्त घेराबंदीचा पहारा चुकवत लक्षावधी कारसेवक अयोध्येत पोहचले होते.
30 ऑक्टोबर 1990 रोजी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटे हा कारसेवेचा मुहूर्त ठरला. सकाळचे ९ वाजून १० मिनिटे झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला ! अयोध्या आंदोलनाचे महानायक अशोकजी सिंघल बाहेर पडले. बरोबर फक्त चार पाचच कारसेवक !
अशोकजीना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळांमधून कारसेवक प्रकटू लागले. कसे ? अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे ! अयोध्येचे सर्व रस्ते ‘रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’, सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे, घोषणांनी दुमदुमायला लागले. अयोध्येत हिंदुशक्तीचा नृसिंह प्रगटला होता.
एवढ्यात हनुमान गढीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास पहेलवान नावाच्या साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली. मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला. कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटांवर चढले. रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे दोन मुसमुसते तरुण बेभान झाले होते. त्यांनी कथित बाबरी ढाच्यावर भगवा फडकवला. ‘जय श्रीराम’ घोषणेने आसमंत निनादला. मुलायमसिंह यादव यांच्या अयोध्या मे परिंदा भी पर नही मार सकता, या अहंकारावर रामभक्तांनी मात दिली होती. प्रतिकात्मक कारसेवेला यश आले होते. देशातील लांगुलचालनाच्या, छद्म धर्मनिरपेक्षतेला रामभक्तांनी लगावलेली ती सणसणीत चपराक होती. संघटित हिंदू शक्तीचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारा हा शुभदिवस होता !
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827
———–
#rammandir #hindu #ram #bjp #ayodhya #hinduism #india #narendramodi #jaishreeram #rss #hindutva #modi #jaishriram #hindustan #sanatandharma #kattarhindu #yogiadityanath #bajrangdal #bharat #bhagwa #mahadev #hindurashtra #hanuman #yogi #vhp #kattar #harharmahadev #namo #shiva #ayodhyarammandir