
नाशिक NASHIK : राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन National Youth Festival कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी NAREDRA MODI यांनी आज नाशिकमध्ये आगममन होताच निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत रोड शो केला. यावेळी खुल्या जीपवर त्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळाले. नाशिक दौऱ्यात मोदी यांनी गोदास्नान केले. त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन विधीवत् पूजाही केली. मंदिरातील महाआरतीमध्ये ते सहभागी झाले होते.
या वाहनात मोदींच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, पाठीमागच्या बाजूला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असा राजकीय संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या रामकुंड परिसराला त्यांनी भेट दिली. पुरोहित संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिककरांच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी यावेळी संकल्प करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.
काळाराम मंदिरात दर्शन
गोदास्नानानंतर पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आले. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले.