
‘वंदे मातरम् ‘ च्या जयघोषाने दुमदुमले साई सभागृह
नागपूर (Nagpur) 26 जानेवारी :-
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित आयोजित करण्यात आल्या ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीत व नृत्याच्या कार्यक्रमाने संपूर्ण साई सभागृहात भारावून गेले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकश्रोत्यांनी ‘वंदे मातरम् ‘ चा एकच जयघोष केला. या कार्यक्रमाचे संयोजन प्रसिद्ध गायक अमर कुळकर्णी यांनी केले होते. संगीत नियोजन आनंद मास्टे यांचे होते, तर गजानन रानडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

गायक सारंग जोशी, मंजिरी वैद्य-अय्यर, आकांक्षा चारभाई व अक्षय चारभाई यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात “हिंदुस्थान की कहानी’ व “वंदे मातरम्” या गीतांनी दणक्यात झाली. अमर कुळकर्णी यांनी सादर केलेल्या ‘वेद मंत्राहुनि आम्ही’ या सुरेल गीताने सारेच भारावून गेले. गायकांनी “शिव तांडव”, “यदा यदाहि”, “बुद्धं शरणं”, “हे हिंदू शक्ती”, “अरुणोदय झाला”, “जयोस्तुते”, “आज हिमालय की”, “ताकत वतन की”, “मैं लड़ जाना”, “जननी जन्मभूमि”, “जिंदगी मौत ना”, “मेरे घर राम”, “मेरे भारत का बच्चा”, “मिले सुर मेरा तुम्हारा” अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते सादर केली. या गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

श्रीकांत धबडगांवकर व अवंती हर्षे यांच्या नृत्य संयोजनात कलाकारांनी “हम करें राष्ट्र आराधना”, “ये देश है”, “मेरा रंग दे”, “भारत हमको”, “सुनो गौर से दुनियावालो” या गीतांवर नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. गोविंद गडीकर, अमर शेंडे, गौरव टांकसाळे, पंकज यादव, नंदू गोहणे, विक्रम जोशी व विशाल दहासहस्त्र या वाद्यकलाकारांनी गायकांना उत्तम साथ देत कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. या कार्यक्रमाचा समारोप ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या अतिशय लोकप्रिय गीताने झाला.



















