रोहित पवारांचाही आव्हाडांवर निशाणा!

0

(Mumbai)मुंबई-सध्या नाराज असलेले (NCP leader Rohit Pawar)राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही वादग्रस्त वक्तव्याबद्दल (Jitendra Awad)जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. देव आणि धर्माचे राजकारण कुणीही करू नये, असा सल्ला त्यांनी दिलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला. “आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे”, असे रोहित पवार म्हणाले.

“देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचे राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ..”असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

आव्हाडांविरुद्ध अजित पवार गटही आक्रमक

(Thane)ठाणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आक्रमक झाला असून काल कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घरापुढे निदर्शने केली.
जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर अजित पवार गटाचे कार्यकर्ते रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदविण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वर्तक नगर पोलिसांनी ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरेंद्र वाघमारेंसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

 

“..तर खेद व्यक्त करतो”, आव्हाड बॅकफूटवर

(Shirdi)शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भाजपने आक्रमक भूमिका घेतल्यावर आता आव्हाड बॅकफूटवर आले आहेत. “माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो”, या शब्दात आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. राम, प्रभू श्रीराम, ज्याला आम्ही महाराष्ट्रात आम्ही पांडुरंग हरी म्हणतो. हा वाद मला वाढवायचा नाही”, असेही ते म्हणाले.
गुरुवारी आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला. “मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो. पण जे याविरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, वाल्मिकी रामायणामध्ये सहा स्कंद आहेत. त्यातील श्लोक मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही”, असे आव्हाड म्हणाले.