संघ साजरी करणार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंची त्रिशताब्दी जयंती

0

नागपूर, (Nagpur)16 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 31 मे 2024 पासून इंदोरच्या महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी करणार आहे. संघाच्या नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Sarkaryawah Dattatreya Hosabale)यांनी या कार्यक्रमा संदर्भात अधिकृत वक्तव्य दिले आहे.

संघाच्या प्रतिनिधी सभेत देवी अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीसंदर्भात सरकार्यवाह म्हणाले की, देवी अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती 31 मे 2024 पासून सुरू होत आहे. अहिल्याबाई होळकरांचे जीवन भारतीय इतिहासातील सुवर्ण महोत्सव आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलीपासून ते असाधारण राज्यकर्त्यापर्यंतचा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असल्याचे होसबळे म्हणाले. तसेच अहिल्याबाई या परिश्रम, साधेपणा, धर्माप्रती समर्पण, प्रशासकीय कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि उज्ज्वल चारित्र्याचे अद्वितीय उदाहरण होते. अहिल्या देवी होळकरांच्या राजमुद्रेवर ‘श्री शंकर आज्ञेवरुन’ (भगवान शंकराच्या आज्ञेनुसार) असे अंकित होते. त्यांनी भगवान शंकराच्या प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार चालवला. त्यांचे लोककल्याणकारी शासन हा एक आदर्श शासन होते. त्यांच्या राज्यात भूमिहीन शेतकरी, भिल्ल आणि विधवा यांसारख्या आदिवासी समूहांच्या हिताचे रक्षण होत असे. सामाजिक सुधारणा, कृषी सुधारणा, जलव्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, लोककल्याण आणि शिक्षण यांना समर्पित असलेली त्यांची राजवट न्यायप्रिय होती. समाजातील सर्व घटकांना सन्मान, सुरक्षा आणि प्रगतीची संधी देणारी समरसतेची दृष्टी त्यांच्या प्रशासनाचा आधार होता. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील तसेच संपूर्ण देशातील मंदिरांच्या पूजा व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले. बद्रीनाथपासून रामेश्वरमपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत आक्रमणकर्त्यांकडून भ्रष्ट झालेल्या मंदिरांची त्यांनी पुनर्बांधणी केली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आणि आक्रमणांदरम्यान विस्कळीत झालेल्या तीर्थक्षेत्रांना त्यांच्या कार्यांनी नवीन चेतना आणली. या महान कार्यांमुळे त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही पदवी मिळाल्याचे सरकार्यवाह यांनी सांगितले. भारतभर पसरलेल्या या पवित्र स्थळांचा झालेला विकास हा खरे तर अहिल्याबाईंच्या राष्ट्रीय द्रष्टेचा परिपाक आहे.

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व स्वयंसेवक व समाज बांधवांनी मनापासून सहभागी व्हावे, असे आवाहन होसाबळे यांनी केले. अहिल्याबाईंनी दाखविलेल्या साधेपणा, चारित्र्य, भक्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मार्गावर पुढे जाणे हीच अहिल्याबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल असेही होसबळे यांनी सांगितले.