जयंत माईणकर
शतकांचे शतक गाठणाऱ्या सचिनने आयुष्याचे अर्धशतक पार केले. (SACHIN RAMESH TENDULKAR) सचिन रमेश तेंडुलकर ! भारतीयांसाठी क्रिकेटचा देव! १९८८ साली वयाच्या पंधराव्या वर्षी (VINOD KAMBALI) विनोद कांबळी बरोबर हॅरिस शिल्डमधील एका सामन्यात चक्क ६६४ रेकॉर्ड ब्रेक धावांची भागीदारी करून सचिनने आपल्या आगमनाची वर्दी क्रिकेट जगताला दिली होती.या ६६४ धावात सचिनच्या होत्या ३२९ तर विनोद कांबळीच्या ३४९!
त्याच वर्षी मी मुंबईत पत्रकर म्हणून (Free Press Journal) फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात रुजू झालो होतो. सचिनची निवड मुंबईच्या रणजी संघात झाली होती. मला आठवतं स्टॅन्ली डिसुझा रणजी मॅच कव्हर करून संध्याकाळी रिपोर्ट लिहायला यायचा आणि मी त्याला प्रश्न विचारीत असे what was Sachin’s score? लागोपाठ दोन दिवस सारखाच प्रश्न विचारल्यानंतर स्टॅन्ली तिसऱ्या दिवशी मला म्हणाला Jayant, not only you but everybody wants to know only Sachin’s score! आणि ते खरं आहे. १९८८ साली ६६४ धावांची भागीदारी केल्यापासून २०१३ साली २०० कसोटी सामने खेळून निवृत्त होईपर्यंत तमाम भारतीय क्रिकेट प्रेमी एकच प्रश्न विचारत होते सचिनचा स्कोअर काय? १९८८ लाच सचिनची पहिली मुलाखत घेतली होती अभिनेता टॉम आल्टरने! त्यावेळी सचिननवेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी दर्शवली होती.
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी दर्शवली होती ॲम्ब्रोस, मार्शल, पॅटरसन, वॉल्श यांच्यासमोर बॅटिंग करायला पंधरा वर्षाचा सचिन तयार होता. पण बी सी सी आय तयार नव्हतं. सचिनला वाट पहावी लागली १९८९ सालच्या पाकिस्तान दौऱ्याची. १६ वर्षाच्या सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत. सचिन, सौरभ, राहुल तिघेही समवयस्क! लक्ष्मण त्यांच्याहून दोन वर्ष लहान. चौघेही भारतीय फलंदाजीचे चार प्रमुख आधारस्तंभ.
पण सचिन त्यांच्याहुन सात वर्षे आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला होता.१९९६च्या ज्या इंग्लंड दौऱ्यात सौरभ आणि राहुलनी कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली त्या दौऱ्यात सचिन होता उपकप्तान! वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी क्रिकेट मध्ये पदार्पण केल्याचा त्याला मिळणारा सर्वात मोठा फायदा. तो आपल्या समकालीन खेळाडूंपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहिला. १९९४ साली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिन सलामीला आला तो कर्णधार महंमद अझरुद्दीन आणि कोच अजित वाडेकर यांच्यामुळे! आणि तिथूनसुरू झाली तमाम भारतीयांना भुरळ घालणारी सचिनची नवी इनिंग. कोण विसरू शकतो ती शारजाहतल्या वादळानंतरची सचिनची ती वादळी इनिंग! त्या इनिंगमध्ये आणि कदाचित क्रिकेट कारकिर्दीत एकदाच सचिन आपल्या साथीदारावर लक्ष्मणवर ओरडताना दिसला . सचिनला एक धाव हवी होती.पण लक्ष्मण तयार नव्हता. ‘ भाग नही सकता क्या ‘ चिडलेला सचिन लक्ष्मणवर ओरडताना टी व्ही वर दिसला. त्या घटनेनंतर कितीतरी वर्षांनी त्याबद्दल आपला मोठा भाऊ अजित आपल्याला कसा रागावला, हे सचिननेच सांगितल. लक्ष्मणसुद्धा देशासाठीच खेळत आहे हे विसरायचं नाही, मोठा भाऊ अजितचा सल्ला. आपली चूक कबूल करायला आणि आपल्या धाकट्या भावाची चूक सांगायला मोठेपणा असावा लागतो.आणि तो सचिनमध्ये आहे.
सचिनची क्रिकेटमधील गुणवत्ता ओळखून आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करत केवळ सचिनकडे बघणारा त्याचा मोठा भाऊ अजित!
सचिनच्या आत्मचरित्राचा लेखक. तेही सचिनचा सावत्र भाऊ असून! राम – लक्ष्मण हे आदर्श सावत्र भाऊ मानले जातात. पण शेवटी ती एक पौराणिक काल्पनिक कथा! वास्तविक जीवनात आदर्श सावत्र भावंडं म्हणजे अजित, नितीन, सविता आणि सचिन! सचिनला आपल्या भावांचा सावत्र म्हणून उल्लेख करण आवडत नाही. स्व. रमेश तेंडुलकरांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आणि तिच्याच बहिणीशी तेंडुलकरांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे सचिन आपल्या आईला आई म्हणतो तर इतर तिघे मावशी म्हणतात.पण सचिनची सर्वांशीच सारखी जवळीक!
सचिनच्या क्रिकेटमधील गुणवत्तेचं सर्वानाच आश्चर्य वाटायचं.त्याच्याविषयी सर्वानाच आदरयुक्त भीती असायची.क्रिकेट प्रशिक्षक अंशुमन गायकवाड त्याला एकदा म्हणाले तुला डाव्या हाताने बोलिंग करता येते? हो! सचिनचं उत्तर! पण याच गुणवत्तेमुळे त्याला द्वेशाचाही सामना करावा लागला. आणि दुर्दैवाने त्याच्यात नेतृत्व गुण नव्हते. जे सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंग धोनीमध्ये ठासून भरलेले होते. माझ्या दृष्टीने पीच कशी आहे हे कधीही न पाहता केवळ आलेल्या बॉलला सीमापार करणे हे आद्य कर्तव्य मानणाऱ्या वीरेंद्र सेहवाग मध्ये नेतृत्व गुण होते पण त्याला संधीच मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियातील १९९९ सा तीनही कसोटीतील पराभवानंतर तो रडला होता.
कर्णधाराला न साजेशी गोष्ट!
१९९९लाच मॅच फिक्सिंग स्कँडल बाहेर आलं. अझरुद्दीनसह पाच खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. चौकशी झाली. पण निष्पन्न काहीच झालं नाही. पुढे अझरुद्दीनसह सर्वांवरची बंदी उठली. पण या विषयावर सचिनने कधीही तोंड उघडलं नाही. खर तर अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सचिनने याविषयी खुलेआम मत प्रदर्शित करायला पाहिजे होत.पण सचिन ते करू शकला नाही. १९९९ लाच पाकिस्तान विरुद्धची चेन्नईतील मॅच भारत केवळ चार धावांनी हरला होता. पाठदुखीने बेजार असलेल्या सचिनने विजयापर्यंत भारताला नेऊन ठेवलं.पण पूर्ण विजय मिळवून देऊ शकला नव्हता. २००१ सालची कोलकाता ऑस्ट्रेलिया विरुद्धाची कसोटी लक्षात राहते लक्ष्मणच्या २८१ धावा, हरभजन सिंह ची हॅटट्रिक, राहुल द्रविड च्या १८० धावा यामुळेच! पण या मॅच मध्ये सचिनच्या लेग स्पिनने तीन विकेट्स घेतल्या होत्या. अर्थात त्या विजयातही सचिनचा वाटा होताच. सचिन पाकिस्तानमध्ये द्विशतकापासून वंचित राहिला याला मी कर्णधार राहुल द्रविडला जबाबदार धरतो. पण सचिनने त्या घटनेच्या बाबतीत संयम बाळगला. नाहीतर आज त्याच्या नावावर सात द्विशतके असती. राहुलने डाव घोषित करण्यामागे टीममधील इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांचे प्लॅनिंग होत अस बोललं जात. पण सचिन अवाक्षरही बोलला नाही.
ग्रेग चॅपेलने सचिनला पुन्हा कर्णधार बनवण्याचा घाट घातला. पण सचिन त्याला बधला नाही. पण चॅपेलच्या वादग्रस्त कारकिर्दीवर सचिनने कधीही भाष्य केलं नाही. सर्वात ज्येष्ठ खेळाडू असल्याने त्याच्याकडून ती अपेक्षा होती. क्रिकेट खेळ सांघिक असला तरीही व्यक्तिगत विक्रमाना महत्त्व असतच!
२०११साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्त व्हायला पाहिजे होत. कर्णधार धोनीने सचिन, सेहवाग, गंभीर या तीन स्लो फिल्डर्सना एकत्र खेळवण्यात असमर्थता व्यक्त केली. पण सचिन खेळत राहिला. एक दिवसीय शतकांच अर्धशतक पूर्ण करण्यासाठी! सचिनला कोण सांगणार निवृत्त हो म्हणून! अखेर २०१२ ला एका दिवसीय सामन्यात शतकांचे अर्धशतक न करता सचिन निवृत्त झाला. सचिन कसोटी खेळत राहिला दोनशे कसोटी खेळेपर्यंत. अर्थात याबाबतीत त्याला निवड समितीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा पाठिंबा होता. असाच पाठिंबा एकेकाळी कपिलदेवला निवड समितीने दिला होता. रिचर्ड हॅडलीचा ४३१ बळींचा विक्रम मोडण्यासाठी! कर्णधार नसला तरीही सचिनच्या सल्ल्याला सर्वच कर्णधार
मानत. तो टीमसाठी सचिन पाजी होता. विराट कोहलीचा जन्म १९८९ चा! त्याच वर्षी सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत.
विराट टीममध्ये एकविसाव्या वर्षी आला. तेव्हाही सचिन खेळत होता. म्हणूनच युवराज सिंग त्याला उद्देशून आजोबा म्हणाला होता. सचिन टी ट्वेण्टी खेळला नाही याच मला दुःख आहे. तो एक उत्कृष्ट टी ट्वेण्टी खेळाडू आहे हे त्याने आय पी एल मध्ये सिद्ध करून दाखवलं!
सहा द्विशतक असूनसुद्धा सचिन त्रिशतकापासून वंचित राहिला. त्यामुळे त्याचे टीकाकार त्याला ब्रायन लारा, सेहवाग यांच्याहून कमी लेखतात. पण क्रिकेटच्या अनभिषिक्त सम्राटाने डॉन ब्रॅडमनने सचिनच्या खेळाच कौतुक करत, मास्टर ब्लास्टर माझ्यासारखा खेळतो असं म्हटल होत.एकेकाळी ब्रॅडमनच्या नावावर सगळे विक्रम जमा होते. पुढे ते विक्रम गावस्कर, बॉर्डर, लारा यांच्या नावावर होते. पण आज सर्व विक्रम एकट्या सचिनच्या नावावर आहेत.त्याच्या विक्रमाला कदाचित गवसणी घालू शकेल असा एकच खेळाडू तो म्हणजे विराट कोहली! आज त्याच्या नावावर ७५ शतकं जमा आहेत. पण कोहलीच वय आणि फॉर्म पाहता तो शंभर शतकांचा विक्रम मोडण कठीण जाईल असं वाटतं.
सचिन राज्यसभेवर सहा वर्षे होता. या सहा वर्षात खेळ आणि खेळाडूंसाठी काय केलं हा एक प्रश्नच आहे. भारतरत्न मिळविणारा तो पहिला खेळाडू ठरला.
आज त्याच्या वयाच अर्धशतक पूर्ण होत आहे. त्याचवेळी त्याच्या मुलाचा अर्जुनचा क्रिकेटच्या क्षितिजावर उदय होत आहे.शतकांचे शतक गाठणारा सचिन वयाच शतक गाठो ही सदिच्छा! तूर्तास इतकेच!