Home LOCAL NEWS ज्येष्ठांनी स्वीकृती, स्पष्टता व समर्पण ही त्रिपदी अंगीकारावी — डॉ. शैलेश पानगावकर

ज्येष्ठांनी स्वीकृती, स्पष्टता व समर्पण ही त्रिपदी अंगीकारावी — डॉ. शैलेश पानगावकर

0

प.पू. श्री नाना महाराज तराणेकर पुण्यतिथी उत्सव भक्तिभावात संपन्न

नागपूर(Nagpur), दि. १२ एप्रिल २०२६ :

सहज स्वीकृती, सहज स्पष्टता आणि सहज समर्पण’ ही त्रिपदी जर आपण अंगीकारली, तर साठी नंतरचे जीवन अधिक समाधानकारक आणि निरोगी होऊ शकते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर यांनी केले.

प.पू. श्री नाना महाराज तराणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित उत्सव रविवारी नागपूर येथे अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. शांती पुरुष सेवा संस्था व अखिल भारतीय त्रिपदी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन सत्रात डॉ. शैलेश पानगावकर यांनी “जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य” या विषयावर अत्यंत मार्गदर्शक विचार मांडले.

ते पुढे म्हणाले की, आयुर्मान वाढत असल्याने वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, त्यामुळे नियमित दिनचर्या, योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. वर्तमानात राहणे, भावनांचे निरीक्षण करणे आणि सामाजिक नातेसंबंध जपणे हे मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात अखिल भारतीय त्रिपदी परिवार, नागपूरचे अध्यक्ष राजीव हिंगवे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी त्रिपदी परिवाराच्या कार्याचा आढावा घेत प.पू. श्री बाबा महाराजांच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. शैलेश पानगावकर यांचा सत्कार केला.

सकाळी शिवाजीनगर येथील चैतन्यपीठ येथे चैतन्य पादुकांचे अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिवसभर भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम पार पडले. सायंकाळी शिवाजी सभागृहात आयोजित कार्यक्रमात करुणा त्रिपदीचे भावपूर्ण सादरीकरण करण्यात आले. सदगुरू श्री नाना महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.