Home MAHARASHTRA मूकबधिर मुलांच्या हास्यात उमलला ‘भीमराव’ कीर्तीचा प्रकाश

मूकबधिर मुलांच्या हास्यात उमलला ‘भीमराव’ कीर्तीचा प्रकाश

0
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून अनोखे अभिवादन

नागपूर(Nagpur) दि. 13 एप्रिल 2026 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी संघर्ष केला. त्यांच्या याच विचारांचा वारसा जपत, महावितरणच्या महाल विभाग तसेच तुळशीबाग-नंदनवन उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी स्थानिक तुळशीबाग येथील ‘कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया’तील विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि भोजन दान करून एक आगळावेगळा ‘सेवा उत्सव’ साजरा करण्यात आला.

केवळ औपचारिकता म्हणून जयंती साजरी न करता, ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतीची गरज आहे, अशा मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत हा आनंद वाटून घेण्यात आला. कार्यक्रमादरम्यान जेव्हा या चिमुकल्यांच्या हातात शैक्षणिक साहित्याचे संच देण्यात आले, तेव्हा त्यांच्या बोलक्या डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून उपस्थितही भावूक झाले होते. शब्दांविना व्यक्त होणाऱ्या त्या कृतज्ञतेने वातावरणात एक वेगळीच संवेदनशीलता भरून आली होती.

हा उपक्रम महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके आणि धीरज बारापात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी व्यक्त केले की, “बाबासाहेबांना अपेक्षित असलेली खरी श्रद्धांजली ही केवळ भाषणांतून नाही, तर कृतीतून आणि वंचितांच्या सेवेतून मिळते. या मुलांच्या आनंदात सहभागी होता आले, हे आमचे भाग्य आहे.”

या स्तुत्य उपक्रमासाठी महावितरणच्या महाल विभाग आणि तुळशीबाग-नंदनवन उपविभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाला सहाय्यक अभियंता वाकडे, बागडे आणि रामटेके यांच्यासह महावितरणचे अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ वीजपुरवठा सुरळीत ठेवणे हीच आमची जबाबदारी नसून, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व निभावणे हे देखील आमचे कर्तव्य असल्याचे या निमित्ताने महावितरण परिवाराने सिद्ध केले आहे.

फोटो ओळ: ‘कल्याण मूकबधिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया’तील विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतांना कार्यकारी अभियंता समीर टेकाडे

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर