पिंपळगावातील शंकरपट झाला शंभर वर्षांचा

0

2 ते 5 फेब्रुवारी दरम्‍यान भव्‍य प्रमाणात आयोजन

भंडारा जिल्ह्यातील इतिहासात पिंपळगाव येथील माजी मालगुजार कै. श्रीमंत चिंतामणराव घारपुरे पाटील यांनी 26/1/1920 ला वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर पिंपळगाव येथे भरवलेल्या शंकरपटाला येत्‍या वसंत पंचमीला म्‍हणजे 2 फेब्रुवारी 2025 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्‍ताने येत्‍या 2 ते 5 फेब्रुवारी दरम्‍यान भव्‍य प्रमाणात शताब्‍दी महोत्‍सवी शंकरपटाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

यावर्षीच्या शंकरपटाचे उद्घाटन मा. नानाभाऊ पटोले, मा. प्रफुल्‍ल पटेल, मा. सुनील फुंडे, मा. परिणय फुके, अध्यक्ष मा. शिवराम गिरीपुंजे, अध्यक्ष मदन रामटेके, मनीषा निंबांते, किशोर मडावी, अभिजीत घारपुरे पाटील व त्‍यांचे कुटुंबिय यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे.

शंकरपटाच्‍या शताब्‍दी वर्षाच्‍या निमित्‍ताने यावर्षी पटाच्या दाणीची बैल धावण्याची शर्यत असलेली पूर्व पश्चिम लांबी 1385 फूट म्हणजे 416 मीटर एवढी ठेवण्यात आली आहे. शंकरपट जिंकणाऱ्या जोडयांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली असून हारणा-या जोड्यांनादेखील बक्षीस दिली जाणार आहे.

शंभराव्या पटसभेचे नेतृत्व श्री सुनील भाऊ पुंडे अध्यक्ष बीडीसीसी बँक, श्री श्यामभाऊ शिवणकर सरपंच तथा स्वागताध्यक्ष या पटाचे नेतृत्व श्री श्याम शिवणकर सरपंच व सर्व सदस्या ग्रामपंचायत पिंपळगाव हे करत आहेत. बैलांच्या शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष श्री नरेश नवखरे हे आहेत.

या पिंपळगावचा शंकरपट पाहण्यासाठी उत्तर महाराष्ट्र,छत्तीसगड, मध्यप्रदेश, खानदेश,पंजाब, आंध्रप्रदेश इत्यादी विविध राज्यातून लोक येतात, हे विशेष. पिंपळगावचा हा शंकरपट जवळच्या दहा गावांचा सण म्हणून साजरा केला जातो. दहाही गावातील पाहुणे हे पिंपळगावचे पाहुणे असतात. भव्‍य बाजार, मनोरंजनाचे कार्यक्रम या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता प्रचंड बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

शंकरपटाचा इतिहास

कै. श्रीमंत चिंतामणराव घारपुरे पाटील यांनी 30 नोव्हेंबर 1919 ला पुत्ररत्न प्राप्‍त झाल्‍याबद्दल शंकरपट भरवण्याचा संकल्‍प केला होता. तत्कालीन गावच्या पंच कमिटी आणि महाजन मंडळींनी 26/1/1920 ला वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर पिंपळगावला पहिल्‍यांदा शंकरपट भरवला. त्‍यात पांढऱ्या रंगाची धावलेली बैलाची जोडी लोकांच्या आजही स्‍मरणात आहे. त्‍यावेळी विजेत्‍या जोडीला बक्षीस म्हणून वेसनी आणि झेंडी देण्यात आली होती. या शंकरपटाने 1944 साली रौप्‍य महोत्‍सव, 1969 साली सुवर्ण महोत्सव तर 1994 वर्षी अमृत महोत्सव साजरा केला होता. मधल्या काळात कोरोना या जागतिक महामारीमुळे तसेच, बैलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे काही वर्षे पट बंद राहिला होता.

सामाजिक उद्देश

हा शंकरपट केवळ मनोरंजनासाठी नसून या पटाच्या माध्यमातून लग्नाची जुळवाजुळव करणे, आर्थिक जडणघडणीची बाजू नातेसंबंधांमध्ये सांगणे, अडीअडचणी किंवा घराघरात एकोपा टिकवण्यासाठी, सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी, विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी, गावाचे संवर्धन होण्यासाठी, गावात नवीन नवीन कामांची विविध अंगी दृष्टी जपण्यासाठी, विविध दृष्टीने गाव आदर्श करण्यासाठी, आणि कुठेही जातीभेद, धर्मभेद न पाळता आदर्श गाव निर्माण करणे हा आहे.