देशमुख, राऊतांवरील कारवाईवरून शरद पवारांची पुन्हा सरकारवर टीका

0

बारामतीः माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत या नेत्यांना तुरुंगात डांबण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर (NCP Leader Sharad Pawar on State Politics) टीका केली आहे. सत्तेचा गैरवापर होत असून अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे दिसून आले आहे. ज्या लोकांना आत टाकले, त्यांच्या चौकशीत काही आढळून आलेले नाही, हे न्यायदेवतेने देखील सांगितले असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले आहे. सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागील सहा महिने व वर्षभरात झाले. सरकारचा दृष्टीकोन चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या माध्यमातून पुढे आले असल्याने आता सरकारने यापासून शिकावे, असेही पवार म्हणाले.
बारामती येथे प्रसार माध्यमांशी पवार बोलत होते. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत असल्याची टीका करून पवार म्हणाले की, सरत्या वर्षात काही चांगल्या गोष्टी देखील घडलेल्या आहेत. शेतीसाठी हे वर्ष चांगले गेले आहे. पर्जन्यमान चांगले झाले. शेती संपन्न झाली तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढते अन्य घटकांना देखील चांगले दिवस येतात. व्यापार आणि उद्योगांची भरभराट होते. आगामी २०२३ मध्ये नवे प्रश्न उभे राहतील. मी उत्सूकतेने नव्या वर्षाची वाट बघत असल्याचे पवार म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही पवार यांनी समाधानच व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत महत्त्वाचा निर्यातदार होऊ शकतो. आज सत्तेवर कुणीही असले तरी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राजकीय मतभेद विसरुन एकत्र राहावे लागेल. अर्थव्यवस्था नीट करावी लागेल. त्याला हातभार लावावा लागेल. देशाचे अर्थकारण सुधारण्यासाठी काळजी घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा