Home LOCAL NEWS नागपूर जिल्ह्यात ई-वाहनांचा ‘सुसाट’ प्रवास!

नागपूर जिल्ह्यात ई-वाहनांचा ‘सुसाट’ प्रवास!

0

307 चार्जिंग स्टेशन्सचे जाळे, महावितरणचा पुढाकार

प्रदूषणमुक्तीकडे जिल्ह्याची वेगाने वाटचाल

49 हजार ई-वाहनांना मिळणार जलद चार्जिंगची सुरक्षा

नागपूर, दि. 2 एप्रिल 2026: वाढते प्रदूषण आणि सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांचा ओढा आता ‘इलेक्ट्रिक वाहनांकडे’ (EV) वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात ई-वाहनांच्या वाढत्या संख्येला बळ देण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून, संपूर्ण जिल्ह्यात 307 सार्वजनिक ई-चार्जिंग स्टेशन्सचे सक्षम जाळे निर्माण केले आहे. यामुळे आता वाहनधारकांना चार्जिंग संपण्याच्या चिंतेपासून मोठी सुटका मिळाली असून जिल्ह्याचा ई-प्रवास अधिक सुखकर झाला आहे.

49 हजारांहून अधिक वाहने रस्त्यावर:
पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला नागपूरकरांनी मोठी पसंती दिली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एकूण 49 हजार 565 इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. ही वाढती संख्या विचारात घेऊन महावितरणने नागपूर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा वेग वाढवला आहे. घरगुती विजेवर चार्जिंग शक्य असले तरी, प्रवासादरम्यान किंवा तातडीच्या वेळी ‘फास्ट चार्जिंग’ची गरज असते. हीच गरज ओळखून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महावितरणची ‘नोडल एजन्सी’ म्हणून महत्त्वाची भूमिका:
राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत महावितरणला ‘नोडल एजन्सी’ म्हणून जबाबदारी दिली आहे. नागपूरसह राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांचा वापर वाढवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार, महावितरणकडून चार्जिंग स्टेशन्ससाठी प्राधान्याने वीज जोडणी दिली जात आहे. केवळ स्वतःची स्टेशन्स उभारणेच नव्हे, तर खासगी उद्योजकांनाही या क्षेत्रात उतरण्यासाठी महावितरण तांत्रिक सहकार्य करत आहे.

विभागावार चार्जिंग स्टेशन्सची उपलब्धता:
जिल्ह्यातील 307 स्टेशन्सचे जाळे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पसरलेले आहे यात नागपूर शहर मंडलातील महाल विभागात 84, काँग्रेस नगर विभागात 66, सिव्हील लाईन्स विभागात 45, बुटीबोरी विभागात 40 आणि गांधीबाग विभागातील 17 चार्जिंग स्टेशन्ससह नागपूर ग्रामीण मंडलातील मौदा विभागात 26, सावनेर विभागात 16, काटोल विभागात 7 आणि उमरेड विभागात 6 चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत.

‘पॉवरअप ईव्ही’ ॲप ठरणार सोबती:
वाहनचालकांना त्यांच्या जवळचे चार्जिंग स्टेशन कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वणवण करण्याची गरज नाही. महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ (PowerUp EV) या मोबाईल ॲपमुळे चालक नकाशावर आपल्या जवळचे स्टेशन शोधू शकतात, स्लॉट बुक करू शकतात आणि सुलभपणे चार्जिंग करू शकतात.

उद्योजकांसाठी मोठी संधी:
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी महावितरणने प्रक्रिया अत्यंत सुलभ केली आहे. स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करण्याची सोय उपलब्ध असून खासगी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, गृहनिर्माण संस्था (Housing Societies) आणि वैयक्तिक ग्राहकही यामध्ये सहभाग घेऊ शकतात. महावितरण यासाठी लागणारी सर्व तांत्रिक मदत पुरवण्यास तत्पर असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर