वर्धा – आय.टी.आय. पास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांची इंटर्नशिप एसटी आगार वर्धा येथे पूर्ण केली. सहा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर देखील एसटी आगाराकडून याबाबत परीक्षा घेतली जात नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांनी एसटी आगार प्रमुखांच्या कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वर्धा जिल्हा अध्यक्ष वरून पाठक यांच्या नेतृत्वात घेराव घालून परीक्षा केव्हा घेता? याबाबत विचारणा केली आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचं सर्टिफिकेट न मिळाल्यास विद्यार्थ्यांना कुठेही पुढील रोजगार मिळणे कठीण होणार आहे. आपल्याला नोकरी मिळावी यासाठी म्हणून इंटर्नशिप केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन परीक्षा प्रमाणपत्र हवे आहे. मात्र, एसटी आगारकडून विद्यार्थ्यांची परीक्षाच घेतली जात नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे वरून पाठक यांनी एसटी आगार प्रमुख यांना विद्यार्थ्यांसह घेरून परीक्षा घेण्याबाबत विचारपूस केली आहे. पुढील पंधरा दिवसात परीक्षा न घेतल्यास मोठ्या पद्धतीचे आंदोलन करण्याचा इशारा देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वर्धा जिल्हा अध्यक्ष वरून पाठक यांनी दिला.