Home Artical Blog “कुशल संघटक” पुरस्काराने सुधीर दिवे यांचा गौरव

“कुशल संघटक” पुरस्काराने सुधीर दिवे यांचा गौरव

0

सहकाऱ्यांच्या क्षमतेला दिशा देऊन सामूहिक यश घडवणारा खरा संघटक: डॉ वेदप्रकाश मिश्रा

नागपूर(Nagpur): “कुशल संघटक म्हणजे केवळ काम करवून घेणारा व्यक्ती नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांच्या क्षमतेला दिशा देऊन सामूहिक यश घडवणारा आणि अपेक्षेपेक्षा अधिक यश संपादन करणारा निष्ठावान व्यक्ती होय,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या टीममधील सुधीर दिवे यांना विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार स्व. प्रकाश देशपांडे स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात आलेला “कुशल संघटक” पुरस्कार यथार्थ ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
शंकर नगर येथील धनवटे सभागृहात आयोजित समारंभात माजी सनदी अधिकारी व कृषी क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारे सुधीर दिवे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रकाश पोहरे, शरद पाटील, तसेच डॉ. गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, माजी नगरसेविका प्रगती पाटील, रूपाली मोरे आणि शुभदा फडणवीस उपस्थित होते.
गेल्या २१ वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सन्मानित केले जाते. यावर्षीच्या (२०२०) पुरस्कारासाठी सुधीर दिवे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी दिवे यांच्या कार्याचे कौतुक करताना विदर्भातील अनुशेषाच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते असताना केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. संघटन ही एक कला असून ती प्रत्येकाला साध्य होत नाही; त्यासाठी माणसं ओळखण्याची क्षमता, उद्दिष्टपूर्तीची जिद्द आणि निष्ठा आवश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात डॉ. गिरीश गांधी यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेत सुधीर दिवे यांची निवड अभिमानास्पद असल्याचे सांगितले. तर शरद पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटन कौशल्य, चिकाटी आणि जिद्दीचा उल्लेख करत दिवे यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला.
सत्काराला उत्तर देताना सुधीर दिवे यांनी स्व. प्रकाश देशपांडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या लेखणी, वाणी आणि कर्तृत्वातून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नितीन गडकरी यांनी दिलेल्या संधीमुळे विविध क्षेत्रात कार्य करता आले, असे नमूद करत संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेली रुग्णसेवा ही आयुष्यातील सर्वात समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले ; पुरस्काराची राशी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला देत असल्याचे जाहीर केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, संत अच्युत महाराज तसेच सहकाऱ्यांना समर्पित करत असल्याचेही त्यांनी नम्रपणे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी दिवे आणि स्व. प्रकाश देशपांडे यांच्या कार्याचा गौरव करत विदर्भाच्या विकासासाठी अधिक गतीने आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले, तर बाळासाहेब कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.