बुलढाणा – सकाळी 5:30 च्या सुमारास सर्व साखर झोपेत असतांना दूरध्वनी खणखणतो, तो उचलताच हॅलो, हॅलो…डॉक्टर, शेलापुर आरोग्य उपकेंद्र,तिथं गरोदर मातेला प्रसूती वेदना होत आहेत. त्या महिलेला घेऊन तत्काळ ‘मोताळा’ ग्रामीण रुग्णालयात दाखल करा. अशा सूचना पुणे मुख्यालयातून मोताळा येथील 108 या रुग्णवाहिकेला मिळताच गाडीवरील डॉक्टर व पायलट नेहमी प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्काळ शेलापुर आरोग्य उपकेंद्रात पोहचतात. गरोदर मातेला गाडीत घेऊन रुग्णवाहिका मोताळा या ग्रामीण रुग्णालयात दिशेने नेण्यात आले.
मध्येच गरोदर मातेच्या वेदना वाढु लागल्या व रस्त्यातच सोबतचे डॉक्टर यांनी महिलेच्या नातेवाइकाच्या साक्षीने तत्काळ उपचार सुरू केला, आणि शेलापुर- मोताळा मार्गावरील चिंचपुर फाट्यावर त्या मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही कोणत्या चित्रपटातील कथा नाही, तर मोताळा तालुक्यात आज सकाळी घडलेली ही घटना आहे. वेळीच योग्य उपचार मिळाल्यामुळे आई व बाळ दोन्ही सुखरूप आहेत. खेड्यापाड्यावरील रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणजे केवळ रुग्णवाहिका नाही तर ती जीवनदायिनी ठरत आहे.हे आजच्या घटनेवरून पुन्हा सिद्ध झाले आहे. पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे बाळ व आई यांना दाखल करण्यात आले.